पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या ‘स्वीप’ टीमने ‘एकच लक्ष्य: 100% मतदान’ या मोहिमेअंतर्गत मतदार जागरूकता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत, स्वीप टीमने अभिरुची मॉल,डीमार्ट धायरी आणि वारजे डीमार्टमध्ये उपस्थित ग्राहकांशी संवाद साधत, त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्याचे कार्य केले.
स्वीप टीमचे सदस्य नागरिकांना मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करताना सांगितले की, प्रत्येक मतदाराचा हक्क हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी लोकांना आपल्या मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन करत मतदार म्हणून आपली जबाबदारी ओळखण्याचा संदेश दिला. मतदानाद्वारे सामाजिक परिवर्तन घडवण्याची संधी असल्याने प्रत्येकाने मतदान करणे अत्यावश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये 100% मतदानाची जागरूकता निर्माण करणे हा आहे. निवडणूक कार्यालयाने नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध ठिकाणी जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानामुळे खडकवासला मतदारसंघातील अधिकाधिक नागरिक मतदान प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास निवडणूक कार्यालयाच्या शरदचंद्र गव्हाळे आणि अमोल पिसाळ यांनी व्यक्त केला.
या जागरूकता अभियानाने मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला असून, विविध माध्यमांद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.