पुणे : बंदुक घेऊन रोडवरुन दुचाकीवरुन जाणार्या दोघांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. त्यात ‘तो’ काही वाहनचालकांवर ती बंदुक रोखत असल्याचे दिसत होते…. सिंहगड रोड पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक केली अन ती दिवाळीतील फटाके उडविण्याची बंदुक असल्याचे समजले . हि बंदूक खरी असल्याचे भासवून लोकांमध्ये भ्रम निर्माण करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलिसांनी या शायनर्स बहाद्दरांवर गुन्हा दाखल केला आहे.अक्षय अंकुश गायकवाड (वय २७, रा. शिवणे), सुनील चंद्रकांत शिंदे (वय २८, रा. वारजे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही पेंटर असून पेंटिंगची कामे करतात.कात्रज – देहुरोड बायपास रोडवरील ) वडगाव पूल ते वारजे पूल दरम्यान दुचाकीवरुन दोघे जण जात होते. त्यातील मागे बसलेल्याने हातात बंदुक घेतली होती. ती तो सर्वांना दाखवत होता. एका कारला डाव्या बाजूने ओव्हरटेक करताना त्यांच्यावर ती रोखलेली दिसत होती. त्यांच्या मागे असलेल्या कोणीतरी त्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकला. तो खूप व्हायरल झाला. दिवाळीसारख्या सणामध्ये भर दिवसा गुंड हातात बंदुक घेऊन रस्त्यावर बिनधास्त फिरत असल्याचे या व्हिडिओमुळे प्रतीत होत गेले .
याबाबत सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी सांगितले की, या व्हायरल व्हिडिओवरुन आम्ही दुचाकीस्वारांचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. दिवाळीतील फटाके वाजविणारी बंदुक त्यांच्याकडे होती. त्यांच्या या कृत्यामुळे लोकांमध्ये भिती निर्माण झाली आणि दहशतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याने त्यांना अटक केली आहे.