महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या बुद्धिबळाचा पट आता जवळपास निश्चित झाला आहे. मुख्य लढत भाजप प्रणित महायुती व काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीमध्ये आहे. पण यात असली विरुद्ध नक्कलीचीही एक लढाई होणार आहे. महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडलेत. शिवसेनेच्या एका गटाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे, तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. त्याच प्रमाणे शरद पवार व अजित पवार यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेस विभागली गेली आहे. यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ सत्तेत कोण येणार? याचाच फैसला होणार नाही, तर अप्रत्यक्षपणे खरी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस कोणती? हे ही ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत महायुती आहे. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाविकास आघाडीसोबत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. त्यानुसार राज्यातील 47 विधानसभा मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना, तर 36 मतदारसंघांत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीत लढत होणार आहे. या जागांवर दोन्ही पक्षांच्या गटांनी पूर्ण ताकद लावली आहे. कदाचित महाराष्ट्राच्या सत्तेचा फैसलाही याच जागांवरून होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी एकनाथ शिंदे यांची शिवसेना 82 जागांवर निवडणूक लढवत आहे. यातील 47 जागांवर त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांशी होणार आहे. उर्वरित 35 जागांवर त्यांच्या उमेदवारांना काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सामना करावा लागेल. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणाऱ्या 47 पैकी 16 जागा मुंबई विभागातील व 18 जागा कोकण विभागातील आहेत. याशिवाय मराठवाडा विभागातील 7 जागांवर दोन्ही शिवसेनेत सामना रंगणार आहे. उर्वरित जागा विदर्भ, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही दुसरी निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईच्या मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या 3 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना फक्त 1 जागा जिंकता आली. अशाप्रकारे मुंबईतील 10, पुण्यातील 2 आणि कल्याणमधील 3 जागांसह विधानसभेच्या 47 जागांवर शिंदे गट व ठाकरे गटात थेट लढत होणार आहे. कोपरी-पाचपाखाडी आणि वरळीसारख्या हायप्रोफाईल जागांचाही यात समावेश आहे. वरळीत शिंदे गटाचे मिलिंद देवरा हे आदित्य ठाकरेंना, तर कोपरी पाचपाखाडीमध्ये ठाकरेंचे केदार दिघे हे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान देत आहेत.
भायखळा, माहीम, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, कुर्ला, विक्रोळी, दिंडोशी, चेंबूर, अंधेरी पूर्व, भांडुप, शिवरी, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या दोन्ही गटांत थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी निर्णायक व अस्तित्वाची लढाई असेल. शिवसेनेच्या दोन्ही गटांत थेट लढत होणाऱ्या प्रत्येक जागेवर चुरशीची स्पर्धा होईल. त्यानंतरच खरी शिवसेना कोण? हे ठरेल, असे मानले जात आहे.
दुसरीकडे, शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार व शरद पवारांच्या गटांत थेट लढत होणार आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात 52 जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी 36 जागांवर त्यांच्या उमेदवारांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा सामना करावा लागेल. अजित पवार यांनी आपल्या 35 विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिले आहे, तर शरद पवार यांनीही त्यांच्यासोबत ठामपणे उभ्या असणाऱ्या 15 आमदारांना उमेदवारी दिली आहे.
अजित पवार विरुद्ध शरद पवार गटातील लढतीचे राजकीय केंद्र बारामती आहे. तिथे शरद पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उभे केले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर अजित पवार यांचे उमेदवार शरद पवार गटाच्या उमेदवारांसमोर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जागांवरही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना शरद पवार गटाच्या उमेदवारांशी दोनहात करावे लागले. त्यात शरद पवारांचा वरचष्मा राहिला. अजित पवारांना फक्त 1 जागा जिंकता आली होती. याऊलट शरद पवारांनी 7 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे अजित पवारांना आपल्या चुलत्याशी लढत देताना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या राजकीय लढती होताना दिसून येत आहेत. राज्यातील 3 क्षेत्रांत भाजप विरुद्ध ठाकरे गटाची लढाई होण्याची शक्यता आहे. ठाणे – कोकण क्षेत्रात शिवसेना विरुद्ध शिवसेनेची लढत आहे, तर मुंबई व मराठवाड्यात भाजपचा सामना उद्धव ठाकरे गटाशी आहे. याऊलट विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात भाजपला काँग्रेसच्या बलाढ्य आव्हानाचा सामना करावा लागेल. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रात भाजप व अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या पक्षाचा सामना करावा लागेल. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना व राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत होणाऱ्या जागांवरूनच महाराष्ट्राचे नवे सरकार ठरेल असा दावा केला जात आहे.