केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला धगधगत्या इतिहासाचे विस्मरण पडल्याची टीका सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी एका पोस्टद्वारे केली आहे.मराठ्यांना “गनिमी काव्या”चा महामंत्र देणाऱ्या व दिल्लीकर जहांगीर बादशहाच्या लष्कराला पाणी पाजणाऱ्या भातवडीच्या युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने विश्वास पाटील यांनी एक विस्तृत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर भाष्य करत सत्ताप्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला सध्या आपल्या धगधगत्या इतिहासाचे विस्मरण झाल्याची खंत व्यक्त केली आहे.
खाली वाचा विश्वास पाटलांची पोस्ट जशीच्या तशी
मराठ्यांना “गनिमी काव्या”चा महामंत्र देणाऱ्या व दिल्लीकर जहांगीर बादशहाच्या लष्कराला पाणी पाजणाऱ्या भातवडीच्या युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण !
केवळ सत्ता प्राप्तीसाठी चटावलेल्या महाराष्ट्राला #धगधगत्या इतिहासाचे दुर्दैवी #विस्मरण !
—विश्वास पाटील
होय मित्रांनो, शिवरायांसह तमाम मराठ्यांना #गनिमीकाव्याचा धडा शिकवणारे भातवडीचे युद्ध ऑक्टोबर सोळाशे चोवीसच्या अखेरीस घडले होते. जिथे #शहाजीराजे व मलिक अंबरने दिल्लीच्या व #विजापूरच्या एक लाख फौजेची आपल्या फक्त चाळीस हजार सैन्यानिशी धूळदाण केली होती. त्या घनघोर युद्धाला आज 400 वर्षे पूर्ण झाली. ज्या #युद्धामध्ये #जिजाऊ साहेबांचा ऐन विशीतला लाडका दीर आणि शिवरायांचे चुलते शरीफजीराजे भोसले #हुतात्मा झाले होते. तो प्रसंग #अहमदनगर पासून फक्त 11 मैलावरील भातवडी गावात घडला होता. खरे तर, मराठ्यांच्या इतिहासालाच #कलाटणी देणाऱ्या या घटनेचे स्मरण महाराष्ट्रभर दारोदारी #दिंड्यापताका फडकवून व्हायला हवे होते. मात्र राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी चटावलेल्या आजच्या मानी मराठ्यांना व या भूमीला या पवित्र युद्धाचे विस्मरण घडावे ही किती दुर्दैवी बाब आहे. जिथे आपल्या भूत आणि भविष्यासाठी हुतात्म्यांचे सडे पडले. तोफा धडाडल्या. दुश्मनांचा नायनाट झाला, त्या #स्फूर्तीदायी इतिहासामागे आपण धावायला हवे. पण आजकाल ज्या दिशेने मीडियाचा कॅमेरा फिरतो त्या दिशेनेच सर्वजण धावत असतात. भातवडीच्या युद्धात जेव्हा दिल्लीकर मोगलांचा सेनानायक मनचेहर हा आपल्या तीनशे हत्तींचे दल घेऊन #रणांगणात हाहाकार माजवत होता. तेव्हा त्याचा माज उतरवण्यासाठी शरीफजी भोसले घोडा फेकत निघाले. त्यांनी आपल्या थोरल्या भावाला, शहाजीराजांना शब्द दिला होता की, “मोगलांच्या बलाढ्य हत्तीदलाचा नायनाट केल्याशिवाय मी काय, माझा मुडदाही आपल्या भेटीस माघारा येणार नाही दादा.” दिल्या शब्दाप्रमाणे शरीफजी आणि #हंबीरराव चव्हाणने ते प्रचंड हत्तीदल धुळीस मिळवले होते.
दुश्मनांच्या हजारो तलवारींच्या पात्यांचा नायनाट आपल्या बुद्धीच्या एका समशेरीने कसा करता येतो, त्याचे तंत्र शहाजीराजांनी या युद्धापासूनच आत्मसात केले. अन् तोच महामंत्र शिवरायांना बेंगलोरच्या किल्ल्यात प्रात्यक्षिकासह शिकवला होता. त्याच महामंत्रावर आपला सारा इतिहास घडला होता. दुर्दैवाने आज त्या महाप्रसंगाचे आम्हा सर्वांना विस्मरण व्हावे, यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी असू शकत नाही.
परवा #सिंधुदुर्ग मधील शिवरायांचां पुतळा पडला म्हणून मराठवाड्यापासून सर्वजण तिकडे धावले. परंतु आजच्या #अहिल्यानगर पासून म्हणजेच अहमदनगर पासून अवघ्या अकराव्या मैलावर , म्हणजेच आपल्या उंबरठ्याशी घडलेल्या या महाप्रसंगाचे सर्वांना विस्मरण घडावे, हे आपल्या भूमीचे दुर्दैव आहे.
आज नगर जिल्ह्याच्या तालुक्या तालुक्यामध्ये सत्तेचा सारीपाट, राजकीय प्रचार व #चिखलफेक सुरू आहे. त्यातून नव्या पिढीने थोडी सवड काढून भातवडीच्या रानात जाऊन त्या राष्ट्रासाठी #धारातीर्थी पतन पावलेल्या शरीफजी भोसलेंच्या बाजूला पडलेल्या समाधीवर फुलांच्या चार ओंजळी जरूर वाहव्यात. वर मी दिलेल्या छायाचित्रात या समाधीची किती दुरावस्था झाली आहे हे आपल्या लक्षात येईल .
केवळ प्रसिद्धीसाठी शिवराय आणि #संभाजीराजे यांचे उंच उंच पुतळे उभे करायचे. मात्र त्यांच्याच इतिहासातील खऱ्या घटनांप्रसंगांचा आणि भातवडी सारख्या धगधगत्या स्फूर्तीदायी अग्निकुंडांचा विसर पडू द्यायचा हे या भूमीच्या भवितव्यासाठी फारसे काही चांगले नाही, असेच मला वाटते
या लढाईचे वर्णन प्रत्यक्ष साक्षीदार #परमानंद_स्वामी यांनी आपल्या “शिवभारता”मध्ये केलेले आहे. डॉक्टर बाळकृष्ण यांनी आपल्या “शिवाजी द ग्रेट” या ग्रंथाच्या पहिल्या खंडात त्याबाबत विस्ताराने लिहिली आहे. मी माझ्या शिवरायांच्या जीवनावरील “महासम्राट” कादंबरीच्या #झंजावात या पहिल्या भागातही या लढाईचे संपूर्ण वर्णन केलेले आहे, वाचकांनी तो स्फूर्तीदायी इतिहास जरूर वाचावा.
या निमित्ताने भातवडीच्या युद्धात रणरंग खेळून कीर्तिमान होणाऱ्या शहाजीराजे, शरीफजी भोसले, मलिक अंबर, हंबीरराव चव्हाण, दत्ताजी नागनाथ, मंबाजी भोसले, नरसिंह पिंगळे, मुधोजी फलटणकर, विठोजी काटे अशा तमाम बहाद्दराना माझा मानाचा मुजरा.
-काळाच्या मांडीवरी पहुडला
मर्द शरीफजी ज्या सम्रांगणात
चला वाहू फुले तिथे अन
ओवाळू आसवांची वात !
– विश्वास पाटील