पुणे-लोकसभेला महाविकास आघाडीने एकजुटीने काम केले आहे. त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आम्हाला मतांची मोठी आघाडी मिळाली आहे. भाजपाने या मतदारसंघात सर्व ताकद लावून देखील मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे असा विश्वास पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे वाटोळे केले आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. भाजपाने मतदारसंघात सामाजिक सलोखा उध्वस्त केला आहे. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिक भाजपाला घरचा रस्ता दाखवणार असून आमचा विजय निश्चित करणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी श्री भवानी मातेची आरती करून आशीर्वाद घेत भवानी पेठ येथून रॅली काढून नवी जिल्हा परिषद इमारत येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. बँड व ढोलताशाच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, पक्षाचे झेंडे फडकवत हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी झाले होते.
रॅलीच्या प्रारंभी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी सपत्नीक श्री भवानी मातेला साडीचोळी व पुष्पहार अर्पण करून देवीचा आशीर्वाद घेतला. याप्रसंगी श्री भवानी माता मंदिर संस्थांच्या वतीने रमेश बागवे व त्यांच्या पत्नीचा स्वागत व सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी जगदीश ठाकुर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, ज्येष्ठ नेते अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी नगरसेवक रफिक शेख, लता राजगुरू, पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष गौतम महाजन, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नरुद्दीन अली सोमजी, करण मखवानी, मंजूर भाई शेख, माजी नगरसेवक अविनाश बागवे, संगीता तिवारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा थोरात, मृणाल वाणी, भोलासिंग अरोरा, जुबेरबाबू शेख मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, युवक आघाडीचे गोविंद जाधव सहभागी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणेशहर प्रमुख संजय मोरे, जावेद भाई खान, महिला अध्यक्ष पल्लवी जावळे, चंद्रशेखर जावळे, डॉक्टर अमोल देवळेकर आदि प्रमुख नेते सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्र पक्षांचे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बरोबरच श्री भवानी मातेच्या मंदिरापासून मोठ्या जल्लोषात रॅलीला सुरुवात झाली. एकच वादा रमेश दादा, महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. तिन्ही पक्षाचे झेंडे, पंजा निशाणीचे कटआउट कार्यकर्त्यांनी हाती घेऊन उस्फूर्तपणे रॅलीत सहभागी झाले होते. सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने तसेच मुस्लिम बांधवांच्या वतीने बागवे यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात येत होती. ठिकठिकाणी महिलांकडून बागवे यांचे औक्षण करण्यात येत होते.
चौका-चौकात फटाक्यांच्या आतषबाजीने रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. नागरिकांकडून हात उंचावून यंदा तुमचाच विजय होणार अशा घोषणा देण्यात येत होत्या. तर ज्येष्ठ नागरिक हात दाखवत आशीर्वाद देत होते.