25 वर्षांनंतर मुंबईत संस्थेतर्फे संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन
पुणे : गंधर्वभूषण जयराम शिलेदार आणि गानतपस्विनी पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने 25 वर्षांनंतर मुंबईत संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले असून या निमित्ताने संस्थेचा वैभवशाली इतिहास रसिकांना स्मरणिकेच्या माध्यमातून नव्याने अनुभवता येणार आहे.
संपूर्ण जग संक्रमणावस्थेतून जात असताना, नावाजलेल्या नाट्यसंस्था बंद पडत असताना दसऱ्याचा शुभमुहूर्त साधून केवळ संगीत नाटकेच सादर करायची या निश्चयाने गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांनी दि. 1 ऑक्टोबर 1949 रोजी मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेतर्फे आयोजित पहिला प्रयोग संगीत सौभद्र या नाटकाचा होता. सुरुवातीस ही संस्था बिऱ्हाडी स्वरूपाची होती. सगळे कलावंत आपापल्या कुटुंबासह कंपनीत राहत असत. जुन्या नाटकांबरोबरच दर दोन-तीन महिन्यांनी नवीन नाटक सादर केले जात असे. त्यानंतर आजतागायत मराठी रंगभूमी, पुणे ही संस्था सातत्याने कार्यरत असून मराठी संगीत नाटकाला उर्जितावस्था देण्याचा प्रयत्न करीत आहे.
दि. 8 नोव्हेंबर ते दि. 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संगीत नाट्य महोत्सव दादर येथील शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी (दि. 8) गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत मृच्छकटिक तर दुसऱ्या दिवशी (दि. 9) संगीत संशयकल्लोळ आणि तिसऱ्या दिवशी अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित संगीत सौभद्र या नाटकांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. दररोज दुपारी 3 वाजता नाट्यप्रयोग सुरू होणार आहे. नाट्य महोत्सव गंधर्वभूषण जयराम शिलेदार, गानतपस्विनी पद्मश्री जयमालाबाई शिलेदार आणि स्वरकीर्ती कीर्ती शिलेदार यांना समर्पित करण्यात आला असून त्यांचा संगीतमय जीवनप्रवास लघु माहितीपटाच्या माध्यमातून दाखविला जाणार आहे. संगीत रंगभूमीवरील आजचे आघाडीचे कलाकार निनाद जाधव, चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर, भक्ती पागे, श्रद्धा सबनीस या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून नाटकांचे दिग्दर्शन दीप्ती भोगले यांचे आहे, अशी माहिती संस्थेच्या ज्येष्ठ गायक अभिनेत्री वर्षा जोगळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
संपूर्ण आयुष्य नाट्यसंगीत व रंगभूमीची सेवा करत असलेल्या दीप्ती भोगले लिखित संगीत नादलुब्ध मी, संगीत चंद्रमाधवी आणि संगीत स्वरविभ्रम या नाटकांच्या संहितांचे प्रकाशनही या प्रसंगी होणार आहे.
मराठी संगीत रंगभूमीचे अभ्यासक, कलाकार तसेच नाट्य रसिकांसाठी माहितीपूर्ण ठरेल अशी स्मरणिका या निमित्ताने प्रकाशित करण्यात येत आहे. या स्मरणिकेचे वैशिष्ट्य सांगताना संस्थेच्या प्रमुख दीप्ती भोगले म्हणाल्या, मराठी रंगभूमी, पुणेची वैभवशाली वाटचाल, संस्थेने सादर केलेली सुप्रसिद्ध संगीत नाटके, त्याविषयी गो. रा. जोशी, रा. शं. वाळिंबे, शरद तळवलकर अशा समीक्षक, लेखक, अभिनेत्यांनी काढलेले गौरवोद्गार, दुर्मिळ छायाचित्रे, जुन्या काळात नाट्य प्रयोगांच्या केलेल्या जाहिराती तसेच संस्थेच्या वाटचालीच्या वेगवेगळ्या टप्प्यात केलेले समारंभ, उपक्रम, त्यांचा आढावा या स्मरणिकेतून उपलब्ध होणार असून जुन्या जाणत्या रसिकांना पुन:प्रत्ययाचा आनंद मिळणार आहे. जयमालाबाई शिलेदार आणि कीर्ती शिलेदार यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविताना केलेली अध्यक्षीय भाषणे या स्मरणिकेत पुर्नप्रकाशित करण्यात येत आहेत. या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिभा मतकरी, सुभाष सराफ यांच्या हस्ते होणार आहे.
जुन्या नाटकांबरोबरच संस्थेने संगीत अभोगी, श्रीरंग प्रेमरंग, संगीत मंदोदरी, संगीत चंद्रमाधवी ही आधुनिक संगीत नाटकेही रंगभूमीवर आणली आहेत तसेच कीर्ती शिलेदार यांच्या संकल्पनेतून सखी मीरा हा एकपात्री संगीत नाट्यविष्कारही रसिकांसमोर आणला आहे.
मराठी रंगभूमी, पुणेने आयोजित केलेल्या संगीत नाट्यमहोत्सवाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा आणि संगीत नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
मराठी रंगभूमी, पुणेचा वैभवशाली इतिहास उलगडणार स्मरणिकेतून
Date:

