पुणे-काल रात्री जनतेच्या प्रेमाखातर आपण मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढणारच असा ठाम व्हिडीओ द्वारे दावा करणाऱ्या माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आज सकाळी ते अपक्ष लढणार म्हणून बातम्या प्रसिद्ध होताच दुपारी माघार घेत असल्याचे जाहीर केले
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः-या तत्त्वावर भारतीय जनता पक्ष निष्ठेने जनतेची सेवा करत आला आहे. मी या पक्षाचा एक भाग असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे. त्यामुळे जनतेची सेवा करणे हा उद्देश नेहमीच राहिला आहे आणि तो एक लोकप्रतिनिधी या नात्याने पूर्ण देखील केला आहे.परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार अशी इच्छा व्यक्त केली होती. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या वतीने मला उमेदवारी मिळावी यासाठी मी आग्रही होतो. परंतु भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना संधी मिळाली, काही गोष्टींवरून आमचे मतभेद होते, मात्र आज ते मतभेद माझे नेते आणि राज्याचे भारतीय जनता पार्टीचे सक्षम उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दूर झाले आहेत. त्यामुळे आज कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी मी मागे घेत असून चंद्रकांतदादा पाटील यांना पाठिंबा देत आहे.आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा कोथरूड मध्ये भाजपाचा झेंडा फडकावण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि चंद्रकांतदादांच्या प्रचारार्थ मेहनत घेईल. विशेष म्हणजे या विधानसभेच्या सर्व प्रक्रियेत माझ्या सोबत असणारी जनता आणि कार्यकर्ते यांना विचारूनच मी हा निर्णय घेतला आहे. शेवटी जनतेच्या शब्दाबाहेर मी कधीच जाणार नाही आणि येणाऱ्या काळात जनतेच्या हितासाठी अहोरात्र झटत राहील.
-अमोल रतन बालवडकर
पुण्यातील काेथरुड मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली हाेती. त्यानंतर निवडणुकीसाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी नगरसेवक अमाेल बालवडकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे संकेत दिल्याने चंद्रकांत पाटील यांच्या समाेरील आव्हानात वाढ झाली हाेती. मात्र, भाजपच्या वतीने करण्यात आलेली शिष्टाई साेमवारी फळास येऊन चंद्रकांत पाटील व अमाेल बालवडकर यांच्यात दिलजमाई झाली आहे. बालवडकर यांच्या घरी जाऊन चंद्रकांत पाटील यांनी भेट घेत माघार घेत असल्याचे सांगत त्यांचा शाल देऊन सन्मान केला.
दरम्यान, अमाेल बालवडकर यांचे मेहुणे महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी असलेले अभिजीत कटके यांच्या वाघोली येथील निवासस्थानी नुकतीच आयकर विभागाची छापेमारी झाली होती. त्यानंतर बालवडकर हे आघाडीकडून निवडणूक लढणार असल्याची राजकीय चर्चा देखील रंगली हाेती. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सदर मतदारसंघात माजी आमदार चंद्रकांत माेकाटे यांना तिकिट जाहीर केले. त्यानंतर अमाेल बालवडकर यांनी देखील निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केल्याने नेमका काेणता दबाव बालवडकर यांच्यावर आला? याबाबत राजकीय चर्चा रंगू लागली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे अमाेल बालवडकर यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या कार्यपध्दती बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली हाेती. पक्षात लाेकशाही मार्गाने उमेदवारी मागितली तर आपल्यावर बहिष्कार टाकण्यात आला, काेणते नेते, लाेकप्रतिनीधी आपल्या कार्यक्रमास येऊ दिले जात नाही असा आराेप केला हाेता. तसेच पक्षासाठी रात्रंदिवस काम करुन देखील पक्ष नेतृत्व जर आपल्या कामाची दखल घेत नसेल तर वेगळा निर्णय घेणे आगामी काळात भाग पडेल, असा इशारा देखील दिला हाेता. मात्र, आता बालवडकर यांच्या माघारीमुळे चंद्रकांत पाटील यांना दिलासा मिळणार असून त्यांनी प्रचारात देखील आघाडी घेतल्याचे पाहवयास मिळत आहे.


