पुणे, दि. २३ ऑक्टोबर २०२४: अत्यंत धकाधकीच्या वीजक्षेत्रात काम करताना दैनंदिन एकसुरीपणा कमी व्हावा आणि कार्यालयातील सहकाऱ्यांमध्ये परस्पर संवाद व सामंजस्य वाढावा व्हावे यासाठी रास्तापेठ येथे ‘रिदम ऑफ पीस’चा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महावितरणच्या सुमारे १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध वाद्यांतून तालांची निर्मिती करीत एक लय व एक सूर साधत ‘मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा’ची प्रचिती दिली तसेच या उपक्रमाला मोठ्या आनंदात व उत्साहात प्रतिसाद दिला.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एज्यूहोप फोरमच्या सहकार्याने रास्तापेठ इमारतीमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘रिदम ऑफ पीस’चे आयोजन करण्यात आले. सायंकाळी झालेल्या तासाभराच्या उपक्रमात मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. अनिल घोगरे, श्री. संजीव नेहते, सहायक महाव्यवस्थापक (वित्त) सौ. माधुरी राऊत, समीर इलेक्ट्रो सिस्टीमचे श्री. समीर देवधर तसेच अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र सहभागी झाले होते. ढोलकी व इतर तालवाद्यांतून सर्वांनी श्री. गणेश बोज्जी यांच्या दिग्दर्शनात विविध तालांची निर्मिती करण्याचा आनंद लुटला. संगीताचा गंध नसताना विविध वाद्यांतून परस्पर सामंजस्याने एक ताल, एक लय व एक सूर निर्माण होऊ शकतो हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला व हास्यकल्लोळात या उपक्रमाचा सर्वांनी आनंद घेतला.
यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार म्हणाले की, ‘महावितरणमध्ये दैनंदिन विविध कामांना वेग देण्यासाठी सांघिक कामगिरीला पर्याय नाही. अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचा परस्पर संवाद, सहकार्य व सामंजस्य महत्वाचे आहे. ग्राहकसेवेसाठी २४ तास सज्ज राहावे लागत असल्याने मानसिक संतुलन देखील आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचारी ही महावितरणची संपत्ती आहे. महावितरणने आजवर जी प्रगती केली आहे त्यात सांघिक कामगिरीचा मोठा वाटा आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.
या उपक्रमाचे समन्वयक श्री. समीर देवधर यांनी सांगितले की, यश-अपयश हाताळण्यासाठी मानसिक संतुलन राखणे अतिशय गरजेचे आहे. भावनिक स्थैर्य व तणावमुक्त जीवनशैली हे उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ७ हजार शालेय विद्यार्थ्यांना ‘रिदम ऑफ पीस’मध्ये सहभागी करून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजनासाठी सहसमन्वयक म्हणून ‘एज्यूहोप’च्या साक्षी तांबे, वाद्यांच्या विविध तालनिर्मितीसाठी शुभम कुरवरे, शंकर काळे, सिद्धांत हिंगमिरे व साहील भिडे यांनी साथसंगत केली. सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी केले. या उपक्रमात कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड, विजेंद्र मुळे, रवींद्र बुंदेले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भुपेंद्र वाघमारे आदींसह महिला-पुरुष अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

