ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्रातर्फे पुरस्कार वितरण आणि पदवी प्रदान समारंभ उत्साहात
पुणे : ज्योतिष आणि वास्तुविद्या हे विज्ञान नाही किंवा त्याला कोणताही ठोस आधार नाही, हा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. ज्योतिष वास्तुविद्या शास्त्र विज्ञानाला धरूनच असून दैनंदिन जीवनात त्याची आवश्यकता आहे. या शास्त्राचा व्यापक प्रमाणावर प्रचार आणि प्रसार करण्याची आज आवश्यकता असल्याचे मत ज्योतिषाचार्य अनिल चांदवडकर यांनी व्यक्त केले.
ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्रातर्फे आयोजित पुरस्कार वितरण आणि पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. पुण्यातील पद्मावती भागातील विणकर सभागृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ज्योतिष शास्त्रातील भरीव योगदानासाठी रत्नमाला रमेश कुलकर्णी यांच्या हस्ते अनिल चांदवडकर यांना रत्नमाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ॲड. सुनिता पागे यांनी संस्थेचे कौतुक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यावेळी उपस्थित होते. उमेश कुलकर्णी म्हणाले, वास्तुशास्त्र चार भिंतीचे शास्त्र नसून वास्तुशास्त्र हे जगण्याचे शास्त्र आहे. आपण लाखो, करोडो रुपयांचे घर विकत घेऊन समस्या विकत घेतो. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक लाख वास्तुतज्ञ घडवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या शास्त्राचा उपयोग करून आपले जीवन सुखी, निरोगी, आनंदी बनविण्यासाठी प्रत्येकाने हे शास्त्र शिकणे गरजेचे आहे. अथर्ववेदाचे उपवेद असलेल्या स्थापत्यशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राचा समावेश होतो. त्यामुळे वैदिक संस्कृती वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा उचित सन्मान व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लेखिका प्रिया मालवणकर शारदा पुरस्कार, ज्योतिष व काव्य पुस्तक लिखाणासाठी अंजली पोतदार यांना अक्षरलक्ष्मी पुरस्कार, वेदमूर्ती अनिरुद्ध इनामदार गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ, उज्वला संख्ये यांना वास्तु विशारद, सागर घोडेराव यांना वास्तुभूषण, महेश कुलकर्णी यांना लोलक विशारद, सिद्धांत ओझरकर यांना अंक विशारद तर नितीन पेंडसे, श्रुती पिसे यांना वास्तुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रिया मालवणकर, अनिरुद्ध इनामदार व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांनी वास्तुशास्त्र, ज्योतिष, लोलक विद्या यांमुळे आपल्या जीवनात कसे परिवर्तन झाले तसेच, आपल्या मार्गदर्शनाने सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यातही झालेल्या अमुलाग्र बदलांची माहिती उपस्थितांना दिली. त्यातून या शास्त्रांचा उपयोग जीवनातील समस्या सोडविण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, हे पटवून दिले. त्यामुळे या शास्त्रांचे महत्त्व किती मोठे आहे, हे उपस्थितांच्या लक्षात आले.
वास्तूशास्त्राचा अभ्यास यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रासह देशभरातील तसेच परदेशातील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची परांजपे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वास्तूचे प्रात्यक्षिक करवून पसायदानाने करण्यात आली.