पुणे : दहा वर्षांपूर्वी डोंगर कोसळून संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या स्मृती अद्यापही ताज्या असतानाच दरड कोसळण्याची भिती उराशी बाळगून पुनर्वसनाची वाट पाहत जीवन व्यथीत करणाऱ्या माळीणच्या पसारवाडी आणि उंडेवाडी या वाड्यांमध्ये यंदाची दिवाळी साजरी करण्यात आली. पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानची दिवाळी भेट स्विकारताना, ”आमच्या पिढ्यांनी अशी दिवाळी अनुभवली नाही”, अशी भावूक प्रतिक्रिया वयोवृद्धांनी व्यक्त केली.
दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी, शहरवासीयांप्रमाणे त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील ‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेच्या वतीने रविवारी (ता. २०) डिंभे धरणाच्या कुशीत वसलेल्या पसारवाडी, उंडेवाडी (ता. आंबेगाव) या दुर्गम गावातील ३० आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळ, दोन महिन्याचा किराणा व नवीन कपडे असे साहित्य दिवाळी भेट देण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, कार्याध्यक्ष डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्त्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला.
गावातील ३० कुटुंबांना साखर, तेल, पोहे, रवा, बेसनपीठ, तूप, कडधान्य, डाळी, साबण, चहा पावडर, मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ, ब्लॅंकेट, कानटोपी, आकाश कंदील, बिस्किटे, सुगंधी तेल, साबण, पणती, उटणे, रांगोळी आदी जीवनावश्यक ५३ वस्तूंसह तीनशे वह्या, ४०० पुस्तके, ३० कंपास, ३० दप्तरे, वाटप करण्यात केले. यावेळी देण्यात आलेल्या सौर कंदिलामुळे या वाड्या उजळून निघणार आहेत. गावातील ५० महिलांना साड्या, ४० मुलामुलींना, तसेच १४ ज्येष्ठ नागरिक, ३२ पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले.
कार्यक्रमापूर्वी माळीण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांच्या स्मृती जागविण्यासाठी बांधण्यात आलेल्या स्मृती स्तंभाला फुलांची आरास करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गावात पोचताच गावकऱ्यांनी ढोल, झांज, लेझीम वाजवत पारंपरिक नृत्य करत मिरवणुकीने सर्वांचे स्वागत केले. गावकऱ्यांनी पुणेकरांच्या स्वागतासाठी पानाफुलांच्या मदतीने स्वागत कमान उभारली. घरोघरी रांगोळ्या काढून आकाश कंदील लावण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, विजया पोतदार यांनी आजी-आजोबांचे औक्षण केले.
‘दुर्गम प्रतिष्ठान’ संस्थेचे गणेश काळे, अमोल कुटे, स्वाती सेठ, श्रीकांत मोरे, रविंद्र पठारे, अॅड. प्रमोद पवार, कविता शिंदे, संजय ऐलवाड, सुनिल जगताप, माधवी येलारपूरकर, निलेश जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमासाठी माजी आमदार प्रकाश देवळे, श्रीप्रसाद गिरी, रवि जाधव, राजूशेठ गिरे, अॅड. शिवराज कदम, नितीन शहा, प्रकाश जाधव, संतोष कस्पटे, सचिन झेंडे, सुरेश मांदळे, विनायक अवसरे, वाल्मिक ढोरकुले, अमोल मुंडे, प्रशांत पेंडसे, सिद्धेश जाधव, त्याच बरोबर महिला प्रतिनिधी रश्मी जाधव, सुनंदा मोरे, अपर्णा शेठ, नीलम खंडागळे, योगिणी परदेशी, रेष्मा मोरे, पूनम देशमुख, श्रृती जाधव, समृद्घी सेठ, सलोनी सेठ, सखी ग्रुप, आधार ग्रुप आदींनी सहकार्य केले.

