पुणे : खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजपा आणि भाजपा विरोधी आघाडी दोघेही उमेदवार देण्याबाबतच गॅसवर असल्याने येथील उमेदवार ठरविण्यास विलंब होत असल्याने खुद्द शरद पवार यांनी आज रात्री ११ वाजता मोदीबागेत उमेदवार निवडी साठी विचार विनिमय , चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक बोलविली आहे सचिन दोडके कि बाळासाहेब धनकवडे याबाबतचा निर्णय याचवेळी होईल असे सूत्रांकडून समजते आहे.सुप्रिया सुळे ,आणि अन्य नेते यावेळी प्रत्येक इच्छुकांशी संवाद साधतील असे समजते . दरम्यान येथील भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनीही आज मुंबई गाठली होती तर त्यांच्या उमेदवारीला शह देणाऱ्या मंजुषा नागपुरे यांनीही मुंबईत तळ ठोकला होता . उमेदवारीस उशीर होत असल्याचे तापकीर यांचे म्हणणे फडणवीस यांनी ऐकून घेतल्याचे वृत्त आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठीच भाजप ची 99 उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली.या 99 जणांमध्ये बहुतांश विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे. मात्र खडकवासला मतदार संघातील विद्यमान आमदारांना भाजपने होल्डवर ठेवलं असल्यानं खडकवासल्यातील सस्पेन्स कायम आहे, या विधानसभा मतदारसंघात कोणाच्या गळ्यात विधानसभेची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महायुती बरोबरच महाविकास आघाडी मध्ये तिढा कायम असून जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाणार हा सस्पेन्स कायम राहणार आहे.
महायुतीचा गट पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी महापौर दत्तात्रय धनकवडे निवडणूक लढवणार असल्याच्या वावड्या उठत आहेत .मात्र हि भाजपच्या वाट्याची जागा भाजपा सोडेल कशी हा साधा प्रश्न आहे. तरीही अजितदादांनी ही जागा आपल्याकडे घ्यावी अशी आग्रही मागणी करणारे पत्र दत्तात्रय धनकवडे यांनी अजित पवारांना दिले आहे.माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांचेही नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार) सचिन दोडके, बाळा धनकवडे, काका चव्हाण, यांनी मैदानात उतरण्याची तयारी दाखवली आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघातून विकास दांगट यांच्या नावाची चर्चा अधिक आहे. मागील चार सहा महिन्यांपासून त्यांनी गाठी भेटी आणि संवाद दौऱ्या तून विकास दांगट यांनी संपूर्ण खडकवासला मतदारसंघ पिंजून काढला आहे.