मुंबई-भाजपची पहिली यादी रविवारी जाहीर करण्यात आली. आज शिंदे गट आणि अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सोमवारी 17 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. यामध्ये भरत गावित, सुनिल टिंगरे, संजय बनसोडे, चेतन तुपे यांसह 13 जणांना अर्ज देण्यात आले.
एबी फॉर्म मिळणाऱ्यांमध्ये चेतन तुपे, सुनील टिंगरे, राजेश विटेकर – परिषद आमदार (इच्छुक), संजय बनसोडे, दिलीप वळसे पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके आदींचा समावेश आहे.
भरत गावित हे आधी भाजपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. आता त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. भरत गावित यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. त्यावेळी त्यांचा काँग्रेसचे शिरीष कुमार नाईक यांनी पराभव केला होता. आता भरत गावित यंदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढणार आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 22 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होणार आहे. त्यानंतर नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्यामुळे अजित पवार यांनी ए बी फॉर्मचे वाटप सुरू केल्याचे दिसत आहे.