पुणे:बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी झोपडपट्टी पुनर्वसन (एसआरए) कार्यालयातील तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीविरुध्द बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
शिरीष रामचंद्र यादव आणि प्रतीक्षा शिरीष यादव अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष यादव कार्यरत होते. त्यांच्याकडे वैध उत्पन्नापेक्षा अधिक एक कोटी ३८ लाख ७४ हजार रुपये बेहिशोबी मालमत्ता आढळून आली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. उत्पन्नात विसंगती आढळून आल्याने यादव यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. परंतु संधी देऊनही त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. चौकशीदरम्यान, यादव यांनी भ्रष्ट मार्गाने बेहिशोबी मालमत्ता धारण केली. त्यासाठी पत्नी प्रतीक्षा यांनी प्रेरणा दिल्याचे निष्पन्न झाले. याबाबत ‘एसीबी’कडून बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
त्यावरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पती-पत्नीविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ‘एसीबी’चे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक अनिल कटके करीत आहेत.

