पुणे दि.१९: महिला कायमच विविध उपक्रम राबवित असतात त्यांनी बनविलेल्या उत्पादनांचा दर्जा अभिमान वाटावा अशा प्रकारचा आहे. समाजाचा आणि सरकारचा महिला उद्योजकांवरील विश्वास वाढताना दिसत आहे आगामी काळात तो आणखीन दृढ होत जाणार असून २०३० पर्यंत पन्नास टक्के महिला उद्योग क्षेत्रात कार्यरत असतील असा विश्वास शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
महिला उद्योजकांना प्रोत्साहन व त्यांच्या उज्वल भविष्याला दिशा मिळावी या हेतूने रीझारी प्रस्तुत दिवाळी २०२४ विशेष – रेडियन्स् प्रदर्शनाचे आयोजन शुभारंभ लाॅन्स् डीपी रोड, पुणे येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन आज शनिवार दि. १९ ऑक्टोबर रोजी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी, आकार चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा स्वाती देवळे, सिद्धेश्वर मारटकर गुरुजी, भोसले ग्रुप चे अध्यक्ष किसन भोसले, उद्योजक पोपट खरमाटे, करुणा पाटील, मनीषा तपस्वी, ऐश्वर्या पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, महिला उद्योजकांनी बनविलेल्या उत्पादनांकरिता बाजारपेठ मिळण्यासाठी असे उपक्रम अतिशय महत्वाचे आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांनी बचत गट व इतर माध्यमातून जे उद्योग उभारले आहेत त्याच्यामध्ये बँकांच्या परतफेडीची जे प्रमाण आहे ते ९९% टक्के आहे. तसेच महिला उद्योजक सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करताना दिसतात. त्यामुळे महिला उद्योजक निश्चितपणे कौतुकास पात्र असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. तसेच या उपक्रमाचे आयोजन करणाऱ्या स्वाती देवळे या कार्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून देखील त्यांनी महिला उद्योजकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी ‘रेडियन्स्’ प्रदर्शनाचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक केले.