गुणीजान बैठकीत पापरी चक्रवर्ती यांचे सुरेल गायन
पुणे : महनीय गुरूंचे मार्गदर्शन आणि सुरांप्रती समर्पण भाव असलेल्या जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका पापरी चक्रवर्ती यांच्या सुमधुर दैवी स्वरांच्या सादरीकरणात रसिक तल्लीन झाले.
प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त वर्षभर विविध शहरांमध्ये सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबई यांच्या वतीने गुणीजान बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीराम लागू रंग अवकाश ऑडिटोरिअम येथे आयोजित मैफलीत कोलकाता येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पापरी चक्रवर्ती यांचे गायन झाले.
सांगीतिक क्षेत्रातील दिग्गज कलावंत पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुहास व्यास, पंडित रघुनंदन पणशीकर, विदुषी सानिया पाटणकर, सायली पानसे शेल्लेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र ललित कला निधी, मुंबईचे अध्यक्ष आणि कार्यकारी विश्वस्त, सुप्रसिद्ध संतूरवादक पद्मश्री सतीश व्यास यांनी या मैफलीचे आयोजन केले होते.
पापरी चक्रवर्ती यांनी आपल्या मैफलीची सुरुवात भक्तीरसाची जागृती करणाऱ्या राग भूपमधील ‘येरी आज भईलवा सुखवा मोरे’ या सदारंग रचित बंदिशीने केली. सुमधुर, दमदार आवाज, स्वरांवरील पकड यामुळे सुरुवातीपासून त्यांनी मैफल खुलवत नेली. ‘सहेला रे आ मिल गाये, सप्तसुरन के भेद सुनाये’ ही गानसरस्वती विदुषी किशोरी आमोणकर यांनी अजरामर केलेली रचना ऐकविल्यानंतर पापरी यांनी जणू आपल्या गुरुंप्रती स्वरांचे समर्पण केल्याची भावना रसिकांच्या मनात आली.
यानंतर पापरी यांनी गंभीरता आणि मधुरता यांचे मिश्रण असलेला राग जयजयवंती सादर केला यात ‘आली पिया आली’ ही झपतालातील पारंपरिक बंदिश सादर करून द्रुत लयीत ‘जारे जारे पपिहरा’ ही स्वरचित बंदिश बहारदारपणे सादर केली.
पापरी चक्रवर्ती यांनी मैफलीची सांगता नायकी कानडा रागात विलंबित रूपकमध्ये ‘निरुपिया रसिया’ ही बंदिश सादर करत त्याला जोडून द्रुतलयीमध्ये ‘रतिया मै जागी’ या मोगूबाई कुर्डीकर यांनी रचलेल्या रचनेने केली. गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या पापरी चक्रवर्ती यांच्या गायनाने रसिक नुसते प्रभावितच नाही तर मंत्रमुग्ध झाले. महनीय गुरूंचे मार्गदर्शन आणि स्वरांप्रती समर्पण भाव यातून खुललेल्या गायनाने पापरी यांनी रसिकांना दैवी आनंदानुभूती दिली.
पापरी चक्रवर्ती यांना अजिंक्य जोशी (तबला), निलय साळवी (संवादिनी) यांनी सुरेल, समर्पक साथ केली. कलाकारांचा सत्कार पंडित सुहास व्यास यांनी केला. कार्यक्रमाचे निवेदन, कलाकार परिचय आणि आभार प्रदर्शन पंडित सतीश व्यास यांनी केले.