मुंबई-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. पण त्याचवेळी त्यांनी सरकारला निवडणुकीनंतर हा निर्णय रद्दबातल केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही दिला. सरकारचा टोलमाफी देण्याचा निर्णय स्वागतारार्ह आहे. पण सरकारने निवडणुकीनंतर हा निर्णय रद्द करण्याचा प्रयत्न करू नये. असे होणार नाही आणि मनसे तसे होऊही देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटरवरील टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना दिलेल्या टोलमाफीच्या सवलतीचे स्वागत केले. ते म्हणाले, राज्यात मनसेनेच सर्वप्रथम टोलमाफीची मागणी केली होती. या प्रकरणी जनतेची कशी फसवणूक होत आहे? हे आम्ही लोकांना पटवून दिले. यासाठी सातत्याने भूमिका मांडली. त्यानंतर आता मुंबईतील पाचही एन्ट्री पॉईंटवर टोलमाफी जाहीर झाली आहे. याविषयी मी सरकारचे अभिनंदन करतो व आभार मानतो. सरकारला उशिरा का होईना या गोष्टी समजल्या.
सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या तोंडावर टोलमाफी करायची आणि निवडणूक संपली की पुन्हा हा निर्णय मागे घ्यायचा असे चालणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे होऊ देणार नाही. आम्ही ते खपवूनही घेणार नाही. त्यामुळे सरकारने अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. कारण यापूर्वी काही प्रकरणांत कायदेशीर गोष्टींचा दाखला देत अशा गोष्टी पुन्हा सुरू करण्यात आल्या होत्या.
राज ठाकरे म्हणाले, सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे जनतेला समाधान आहे. आतापर्यंत किती पैसे येतात? किती जातात? हे कळायला काहीच मार्ग नव्हता. टोलनाक्याचा सर्व व्यवहार कॅशवर होता. त्यामुळे किती गाड्या गेल्या? कुणाच्या खिशात किती पैसे गेले? कुणाला किती पैसे मिळाले? हे कुणालाही समजत नव्हते. राजकीय पक्षही यावर गप्प होते. आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतील. पण त्यांचा याच्याशी कोणताही संबंध नाही. हे आंदोलन कुणी केले? हे जगाला माहिती आहे. राज ठाकरेंनी एखादे आंदोलन हाती घेतले की काय होते हे या निर्णयातून स्पष्ट होते. सरकारला टोलमाफी द्यावी लागली आहे.
विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वात जास्त जागांवर निवडून लढवेल, अशी घोषणाही राज ठाकरे यांनी यावेळी केली. आम्ही ही निवडणूक केवळ लढवायची म्हणून लढवत नाही. आम्हाला निवडणूक कशी लढवायची हे ठावूक आहे. आम्ही यापूर्वीही अशा निवडणुका लढवल्या आहेत. याविषयी आमचे दौरे लवकरच राज्यात सुरू होतील. या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मनसे सत्तेत असेल. मनसे आपला जाहीरनामा लवकरच जाहीर करेल, असे राज ठाकरे म्हणाले.