पुणे, – राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली नाही. त्यावर पुणे शहर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामा दिला आहे.
त्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे सर्व राजीनामे पाठविण्यात आले आहेत.
राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली होती.
मानकर यांच्यामुळे शहरात पक्ष मजबूत झाला. तरीही त्यांना विधान परिषदेवर संधी न देता अन्याय करण्यात आला आहे.
त्यामुळे पक्षाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अजित पवार यांचा ठोस शब्द मिळत नाही, तोपर्यंत आम्ही महायुतीचे काम करणार नसल्याचा पवित्रा घेत शहर, विधानसभा, विविध सेलचे पदाधिकारी यांनी राजीनामा दिला.
त्यामध्ये शहर उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, विधानसभा अध्यक्ष हर्षवर्धन मानकर, संतोष नांगरे, महिला अध्यक्ष तेजल दुधाणे, शशिकला गायकवाड, अभिषेक बोके,
कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, उपाध्यक्ष सीमा साळवे, कार्याध्यक्ष राहुल तांबे, युवक सेल अध्यक्ष समीर चांदेरे यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.