गुणीजान बंदिश स्पर्धेच्या उपांत्य फेरीला सुरुवात
पुणे : वाग्ग्येयकार पंडित सी. आर. व्यास यांनी आपल्या कला जीवनातील अनुभवांवर रचलेल्या ‘सुमिर नित रे तू, जासों ताल सुरन रस ग्यान पायो है’, ‘पपीहा पुकारे पी पिया मनमे आनंद भर आयो घडी मिलनकी निकट आईरी’, ‘मोरे नैनवा तरस गयेरी, निठुर पियाकी बाट तकत में’, ‘देख चंदा नभ निकस आयो’, ‘कैसे गुन गाऊँ तोरे गुनिजनको गुनीजाने, हूँ तो एक दास तुम्हरे’ या आणि इतर बंदिशी गायिकांनी तयारीने सादर केल्या.

निमित्त होते गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे (ग्रेस) प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर आयोजित गुणीजान बंदिश स्पर्धेचे.
प्रत्येक कलाकार आपली बुद्धिमत्ता व कल्पनाशक्तीच्या आधारे सतत नवनिर्मितीसाठी प्रयत्नशील असतो, कारण कोणत्याही कलेचा विकास नवनिर्मितीशिवाय शक्य नाही. या विचारातून पंडित सी. आर. व्यास यांनी अनेक बंदिशी रचल्या. या बंदिशींवर आधारित गुणीजान स्पर्धेच्या उपांत्य फेरीला आज (दि. 15) सुरुवात झाली. दि. 15 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे ही स्पर्धा होत आहे.
16 ते 30 वयोगटातील गायकांसाठी आयोजित या स्पर्धेत देशभरातून 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. उपांत्य फेरीची सुरुवात आज (दि. 15) स्त्री गायक स्पर्धकांच्या सादरीकरणाने झाली. बुधवारी (दि. 16) पुरुष स्पर्धकांची उपांत्य फेरी होणार आहे.
उपांत्य ते अंतिम फेरी स्त्री आणि पुरुष अशा स्वतंत्र गटात होत आहे. पहिल्या फेरीतून दहा, दुसऱ्या फेरीतून सहा तर तिसऱ्या फेरीतून प्रत्येकी तीन स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे.
आज सुरू झालेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे (स्त्री विभाग) परीक्षण ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पंडित सुहास व्यास, विदुषी देवकी पंडित यांनी केले.
ठाणे, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, हुगळी, वाराणसी, बंगळुरू, हैद्राबाद, दुर्ग, रायपूर, वलसाड, धारवाड, उत्तर कन्नडा आदी भागातून स्त्री स्पर्धक आल्या आहेत.

‘चरन तुम्हरे अब मैं सुमिर कर गाऊँ, रिझाऊँ, राखो मोरी लाज’, ‘ले जारे पथिकवा इतनो संदेसा, पियाको सुख चैन मोहे कछुक नहिं भावे’, ‘मालनियाँ लावो री आज हरबरन फूलन की माला, गुनिदास के गरवा मैं डारुँ’, ‘ए आलिरी कैसे कहूँ तोहें’, ‘हो पतिया आज पायी उनकी’, ‘आयी रे मिलन तोहे पिया कटत नाही तुम बिन रतियाँ कारी’, ‘ए मन मेरो मोह लेत मंद मुसकान मुखपर तेरो सजनी’, ‘साँवरिया घर नाही आये, रतिया बिताई तरपत सारी उनबिन रोवत रोवत’ आदी बंदिशी सादर करण्यात आल्या.
स्पर्धकांनी सादर केलेल्या बंदिशी पूरिया कल्याण, भटियार, बिहाग, मारुबिहाग, शुद्ध सारंग, धनकोनी कल्याण, बैरागी भैरव, मुलतानी, यमन आदी रागातील होत्या.
स्पर्धकांना लीलाधर चक्रदेव, माधव लिमये, निलय साळवी (संवादिनी), कार्तिकस्वामी, ऋषिकेश जगताप, कौशिक केळकर (तबला) यांनी समर्पक साथसंगत केली.
उपांत्य फेरीतून निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

