उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मोहोळ तालुक्यातील अनगरसह 9 गावांना फायदा
आमदार यशवंत माने यांच्यासह मोहोळ तालुक्यातील जनतेने मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार
मुंबई, दि. 14 : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळसह माढा तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या आष्टी उपसा सिंचना योजनेसाठी आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत 772 कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मोहोळ तालुक्यातील अनगरसह 9 गावातील 3 हजार 900 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून आमदार यशवंत माने यांच्यासह मोहोळ तालुक्यातील जनतेने अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळसह माढा तालुक्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे मोहोळ तालुक्यातील 24 तर माढा तालुक्यातील 3 गावातील 12 हजार 900 हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येणार आहे. या प्रकल्पासाठी आज मंत्रीमंडळाने 722 कोटी 19 लाख रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. या तृतीय सुप्रमा अहवालामध्ये नव्याने समावेश केलेल्या मोहोळ तालुक्यातील अनगरसह 9 गावांमधील एकूण 3 हजार 900 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. या प्रस्तावित तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अनगरसह देवडी, वाफळे, खंडोबाचीवाडी, नालबंदवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी (अ.), हिवरे, वडाचीवाडी, चिखली या गावांना सिंचनाचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळसह माढा तालुक्यासाठी ही योजना गेमचेंजर ठरणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मंत्रीमंडळाच्या बैठकीत आष्टी उपसा सिंचन योजनेसाठी 722 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निर्णयाबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानन्यात येत आहेत.