श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात दस-याच्या दिवशी शनिवारी (दि.१२) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. सकाळपासून भाविकांना सोन्याची साडी परिधान केलेले देवीचे विलोभनीय रुप पाहण्याची व दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच रात्री ९.३० वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी दिली.
उत्सवाच्या आयोजनात ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लदद्ड आदींनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
शनिवारी रात्री ९.३० वाजता होणा-या रावण दहन कार्यक्रमात महिला अत्याचार, स्त्री भ्रूण हत्या या स्त्रियांविषयी असलेलेल्या समस्यांसंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. तसेच प्रत्यक्ष महिला अत्याचाररुपी रावण दहनाचा कार्यक्रम पुणेकरांना पाहता येणार आहे. याशिवाय उत्सवात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण याविषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता मंदिरात होईल. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम देखील होणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने दस-यानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
दस-याला श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी व रावणदहन कार्यक्रम
Date:

