श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे आयोजन ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची उपस्थिती
पुणे : महिलांवरील वाढते अत्याचार… स्त्री भ्रूण हत्या… स्त्री शक्तीचे महत्व आणि महात्म्य भोंडल्याच्या वेळी झालेल्या खेळांतून शिक्षकांनी उलगडले. भोंडल्याची पारंपरिक गाणी व खेळ श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपात सादर करण्यात आले. शिक्षक पारंपरिक वेशात स्पर्धेत सहभागी झाले होते. धारेश्वर विद्यालयाच्या संघाने शिक्षक महाभोंडला स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात शिक्षक महाभोंडला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, डॉ. मनोरमा आवारे, ट्रस्टच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अगरवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, स्पर्धेचे परीक्षक श्रुती पंडित, साधना कानिटकर आदी उपस्थित होते. धारेश्वर विद्यालयाला ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
विश्वकर्मा विद्यालयाच्या शाळेच्या शिक्षक संघाचा द्वितीय तर, चंद्रकांत दरोडे विद्यालयाचा तृतीय क्रमांक आला. स्मृतीचिन्ह, अनुक्रमे ७ हजार व ५ हजार रोख रक्कम, सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक असे सन्मानाचे स्वरुप होते. यावेळी पहिल्या तिन्ही क्रमांकाच्या विजेत्यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजाची बांधिलकी जोपासत दातृत्वाची भावना प्रत्येकाने जोपासायला हवी. असुरांचा वावर वाढतो तेव्हा आदिमाया, आदिशक्ती महिषासुरमर्दिनीचे रूप घेते. हे रूप प्रत्येक महिलेमध्ये असते, ते महिलांनी आपल्यामध्ये जागृत ठेवायला हवे. पुणे विद्येचे माहेरघर आहे. मात्र, येथे मुलींचे प्रमाण कमी आहे. वारसदार म्हणून मुलगा लागतो. त्यामुळे समाजात सर्वांपर्यंत नवदुर्गेच्या रूपाचे महत्व पोहोचायला हवे.
विश्वस्त डॉ. तृप्ती अगरवाल म्हणाल्या, भारतीय संस्कृतीमध्ये भोंडला हा एक प्रकार अनेक वर्षांपासून नवरात्रीमध्ये केला जातो. मात्र, आज भोंडल्याविषयी माहिती लहान मुली व तरुणांनी फारशी नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी भोंडल्याविषयी अधिकाधिक माहिती गोळा करावी आणि विद्यार्थ्यांनाही याची माहिती सांगावी, याकरिता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.