रतन टाटा यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह अनेक नामवंत व्यक्ती भावूक झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांची जुनी मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड, दिग्गज अभिनेत्री सिमी गरेवाल. रतन टाटा यांचं निधन सिमी यांच्यासाठी देखील धक्कादायक ठरलं. त्यांनी सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.
सिमी गरेवाल यांनी रतन टाटा यांना दिला अंतिम निरोप
रतन टाटा यांच्या निधनाची बातमी येताच जगभरातील लोकांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकात सहभागी होत सिमी गरेवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं, “ते म्हणतात की तू निघून गेलास… तुझं जाणं सहन करणं खूपच अवघड आहे… अलविदा माझ्या मित्रा… रतन टाटा.” या शब्दांतून त्यांनी आपल्या जुनी मैत्री आणि भावना व्यक्त केल्या आहेत.
२०११ साली टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिमी गरेवाल यांना रतन टाटा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी सिमी यांनी स्पष्टपणे मान्य केलं होतं की त्यांचं आणि रतन टाटा यांचं जुने संबंध होते. त्यांनी रतन टाटा यांचं कौतुक करत म्हटलं होतं, “रतन एक परिपूर्ण व्यक्तीमत्व होते, त्यांच्यात विनोदबुद्धी आणि नम्रता होती. ते एक परफेक्ट जेंटलमॅन होते. पैसा कधीही त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट नव्हतं.”