
पुणे : जीएसबी संयुक्त कोंकणी सभेतर्फे पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शारदोत्सवाला मंगळवारी (दि. 8) सायंकाळी मंगलमय आणि भक्तीपूर्ण वातावरण सुरुवात झाली. पुरोहितांनी केलेली दुर्गास्तुती, शंखनाद, मंगलवाद्यांचा गजर अन् समईच्या तेजाळलेल्या ज्योतींच्या साक्षीने भाविकांनी वीणाधारिणी श्री शारदा मातेचे दर्शन घेतले.
शारादोत्सव मजेंटा लॉन्स, डी. पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे दि. 8 ते दि. 12 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक पोषाख परिधान करून आलेल्या असंख्य बंधू-भगिनींनी शारदा मातेच्या तेज:पुंज रूपाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.
सुरुवातीस पुण्यातील केशव शंखनाथ पथकाने शंखनाद केला. शंखध्वनीतून गणेशस्तुती, श्रीरामस्तुती सादर केली. के. राघवेंद्र भट, दयानंद भट, गजेंद्र भट आणि विघ्नेश भट यांच्या मंगलाचरणानंतर भाविकांना श्री शारदा मातेचे दिव्य दर्शन घडले. दिव्य दर्शन सोहळ्यानंतर शक्तीने भारित वातावरणात शिवगर्जना ढोल-ताशा पथकाचे दमदार सादरीकरण झाले. भगवे ध्वज फडकावित ‘भीमरूपी महारुद्रा’, ‘जय हनुमान’, ‘जय श्रीराम’ आदींचा घोष ढोल-ताशाच्या वादनातून साकारला. भाविकांनी त्याला उत्स्फूर्त दाद देत ताला-सुरांचा आनंद लुटला.
कर्नाटकातील उत्सवाप्रमाणेच पुण्यात प्रथमच आयोजित शारदोत्सवासाठी वीणाधारिणी देवी सरस्वतीची सुमारे साडेचार फूट उंचीची राजस मूर्ती शाडू मातीपासून साकारण्यात आली आहे. मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शाडू माती कर्नाटकातूनच पुण्यात आणण्यात आली आहे. तसेच कर्नाटकातील कलाकारांनी ही मूर्ती घडविली आहे. श्री शारदा देवीची मूर्ती नेत्रदीपक अलंकारांनी सजविण्यात आली आहे.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी, उपाध्यक्ष जनार्दन भट, सचिव मंजुनाथ नायक, खजिनदार बिपिन पंडित महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.