मुंबई-आदिवासी नेते आमदार नरहरी झिरवळ यांनी आदिवासी आरक्षणाच्या बचावासाठी दोन दिवसांपूर्वी मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या घेत आंदोलन केले होते. आदिवासी आरक्षणाच्या मुद्द्यानंतर आज आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला. आरक्षणासंदर्भात जीआर काढावा तसेच आमचे निवदेन स्वीकारावे, या मागणीसाठी 3 धनगर समाजबांधवांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या घेतल्या.
धनगर आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी उपोषणाला बसलेले आंदोलक आज मंत्रालयात दाखल झाले. धनगर समाजाला आदिवासी समाजाचा दर्जा द्या, या मागणीसाठी हे आंदोलन केले जात आहे. मागणीच्या निवेदनाची कागदपत्रे हातात घेवून या आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळ्यांवर उड्या घेतल्या. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना बाहेर काढले.
पोलिसांनी जाळीतून बाहेर काढल्यानंतर आंदोलकांनी मंत्रालयात दुसऱ्या मजल्यावर ठिय्या दिला आहे. यावेळी समाजबांधवांकडून आक्रमकपणे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. धनगर आरक्षणाच्या संदर्भात शासन निर्णय काढा, अशी मागणी आंदोलकांनी केली. उपमुख्यमंत्री यांनी आपला शब्द पाळावा, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र वेळ निघून गेली असून आज आमची बैठक रद्द केली, असे आंदोलकांचे म्हणणे आहे. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली.
शिंदे सरकारने धनगर आरक्षणाबाबत आम्हाला शब्द दिला होता. त्यासाठी आम्हाला 15 दिवसांचा वेळ दिला होता. ही वेळ निघुन गेली असून सरकारने आपला शब्द पाळला नाही. आज त्यांच्यासोबत आमची शेवटची मीटिंग होती, मात्र त्यांनी ती देखील रद्द केली, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
जे मागून मिळत नाही, ते हिसकावून घेणार. आम्ही कुणाच्याही नेतृत्वात हे आंदोलन करत नाही. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, ही मागणी मागील साठ वर्षांपासूनची आहे. हे आरक्षण तात्काळ लागू झाले पाहिजे. आम्ही आदिवासीतून आरक्षण मागत नाहीत. तर आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत, असेही आंदोलकांनी सांगितले.धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे (एसटी) आरक्षण देण्याच्या निर्णयाविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शुक्रवारी यासंबंधी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. त्यांच्यासोबत आमदार हिरामण खोसकर यांनीही उडी मारली होती. या घटनेत झिरवळ यांच्या मानेला दुखापत झाली होती. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये. याशिवाय आदिवासींची पेसा कायद्यांतर्गत भरती करावी, अशी मागणी झिरवळ यांनी केली होती.