सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचेआंदोलन -राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज
पुणे -शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील सरकार टोकाचे उदासीन आहे. एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात कुठेतरी महिलांवर अत्याचार सुरू असताना राज्यातील सरकार मात्र स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे.या सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने अलका चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्री राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून गेला.
या आंदोलनास याप्रसंगी माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अरविंद शिंदे ,संगीता तिवारी, अजीत दरेकर, संजय मोरे, गजानन थरकुडे, रवींद्र धंगेकर,स्वाती पोकळे, मंजीरीताई घाड़गे, मनाली भिलारे, गणेश नलावडे, रोहन पायगुड़े, राजश्री पाटील तनया साळुंखे यांच्यासह महाविकास आघाडीचे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करताना महायुती सरकार महिला सुरक्षेबरोबरच पोलीसांचेही मनोबल खच्ची करत असल्याचे सांगितले. बोपदेव घाटात बलात्कार करणारे नराधम आजही मोकाट फिरत आहेत,त्यामुळे त्यांना अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा दिला. तसेच येत्या दोन दिवसात पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत असतानाही राज्यातील सरकार मोठे मोठे कंत्राट संमत करत आहे. आज राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हे सरकार महिला सुरक्षेबरोबरच आर्थिक आघडीवरही अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच राज्यातील आर्थिक स्थितीवर महायुतीतील कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान दिले. त्याचबरोबर आज महागाई देखील वाढली आहे. त्यामुळे अपयशी ठरलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.