पुणे-
वंचित विकास, एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वर व वीर शिवराज मित्र मंडळ, गुरुवार पेठ यांच्या सयुंक्त विद्यमाने नवरात्री निमित्त रविवार, दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरभी मंगल कार्यालय, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पुणे येथे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वंचित विकास अभया (एकल) महिलांसाठी मागील १० वर्षांपासून काम करत आहे. आपली रोजची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यात गढून गेलेल्या या महिला अशा सणावारांच्या निमित्ताने बाहेर पडतात व थोडा वेळ का होईना आपल्यातील आनंद शोधतात. एकल महिला तर अजूनही अशा सामुहिक कार्यक्रमात जाणे टाळतात. चाळीशी ओलांडलेल्या व ज्येष्ठ महिला वयाची कारणे पुढे करून जाणे टाळतात. त्यामुळे खास अशा महिलांसाठी त्यांच्या मुला-मुली, नातवंडे यांसोबत या आगळ्यावेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तावरे कॉलनी, कसबा पेठ, मंगळवार पेठ, अप्पर इंदिरानगर, चव्हाण नगर, तळजाई वसाहत, इ. वस्त्यांमधील १५० हून अधिक ज्येष्ठ महिलांनी भोंडला व गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला.
प्रत्येक सणावारांना वेगवेगळ्या प्रकारचे विद्रुपीकरण येत असलेले आपण दिवसेंदिवस पहातो आहे. सणवारांमध्ये धांगडधिंगा, असह्य होणारे स्पीकरचे आवाज, यात आपली परंपरा, पारंपारिक खेळ, सणांचे महत्व सांगणाऱ्या ज्येष्ठ महिला या विरळ होत चालल्या आहेत. या पारंपारिक खेळांचे, संस्कारांचे तिसऱ्या पिढीकडे संक्रमण होणे आवश्यक आहे.
तसेच विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढल्याने नातवंड आणि आजी आजोबा यांमध्ये मोठा दुरावा निर्माण होत आहे व एकमेकांच्या प्रेमाला पारखी झालेले हे दोन जीव आपल्याला जागोजागी पहायला मिळतात. या निमित्ताने हे सर्व एकत्र आले व नवरात्रोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ ही साजरा करण्यात आला.
अशा प्रकारे कधीही आनंद घेता न आलेल्या या अभया महिलांना काही क्षण भक्तिभावाने व उत्साहाने भरलेल्या वेगळ्या विश्वात घेवून जाणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश्य या कार्यक्रमाने साध्य झाला..
अरण्येश्वर अखिल तावरे कॉलनी मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, वंचित विकास वृद्धमित्र प्रकल्पाचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्व गणेश मंडळातील कार्यकर्ते, मुले व महिला यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला. अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त श्री. विश्वास भोर, हिरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भैइलुमे सर, जयहिंद मित्र मंडळ अध्यक्ष विजय आवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
वीर शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल यांच्या तर्फे उपस्थितांना उपवास फराळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सुरभी मंगल कार्यालयाचे संचालक बाळासाहेब तावरे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले व वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.