पुणे: दौंड शहरातील खाटीक गल्लीत बांधलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखान्याविरोधात वारकरी संप्रदायाने सोमवारी विराट मोर्चा काढला. सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदायातील शेकडो युवक-युवती रस्त्यावर उतरले होते. दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा हा मोर्चा निघाला. हा कत्तलखाना येथे होऊ नये, तो त्वरित जमीनदोस्त करावा आणि त्याठिकाणी अन्य कोणत्याही समाजोपयोगी प्रकल्पाची उभारणी करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार शरद भोंग यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
दौंड नगरपालिकेने २०१७ साली दौंडच्या खाटीक गल्लीत शासकीय कत्तलखाना मंजूर केला. जवळपास सात कोटी रुपयांच्या निधीतून याचे बांधकाम व येथील अत्याधुनिक यंत्रसामुग्री उभारण्यात आली. या कत्तलखान्यामध्ये दररोज ५०० ते १००० जनावरे कापली जाणार असून, महाराष्ट्रातील लाखो जनावरांचे रक्त येथे सांडले जाणार आहे. अनेक गोमातांची कत्तल आणि हत्या होणार आहे. यासह भीमा-चंद्रभागा नदीतीरावर वसलेले पवित्र दौंड शहर धौम्य ऋषींच्या तपश्चर्येचे स्थान आहे. या कत्तलखान्यात कापलेल्या जनावरांचे रक्ताचे अशुद्ध, अपवित्र पाणी दौंड ते पंढरपूर वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये सोडले जाणार असून, पुण्यासह अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना हे अशुद्ध पाणीच नव्हे, तर जनावरांचे रक्त प्यावे लागेल.
ही भीषण परिस्थिती रोखण्यासाठी हा कत्तलखाना सुरु होण्यापूर्वीच बंद पडण्याची गरज आहे. त्यासाठी शासनावर दबाव निर्माण करायला हवा. याठिकाणी शासनाने इतर कोणताही समाजाच्या हिताचा प्रकल्प उभारावा, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. दौंडचा कत्तलखाना बंद केला नाही, तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा मठाधिपती रामगिरी महाराज यांनी दिला आहे. हभप शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.