लेखक, प्रकाशक ॲड. डी. बी. सोनावणे यांच्या सात पुस्तकांचे प्रकाशन
पुणे : आंबेडकरी चळवळीत कालौघात शिरलेले काही नकारात्मक मुद्दे परखडपणे मांडण्याचे महत्त्वाचे कार्य ॲड. डी. बी. सोनावणे यांनी केले आहे. त्यांनी मानवतावादी दृष्टीने केलेली वैचारिक मांडणी हा नव आंबेडकरवाद म्हणावा लागेल, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे काढले.
लेखक, प्रकाशक ॲड. डी. बी. ऊर्फ दादासाहेब सोनावणे लिखित सात पुस्तकांचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आरोग्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. पवन साळवे, ॲड शारदा वाडेकर, केशव गाडे, सुहासिनी धिवार, राहुल मकरंद हे मान्यवरही व्यासपीठावर होते.
माणुसकीचा मार्ग सांगणारा बुद्ध, डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीतील राजकीय आणि सामाजिक नेते, हिऱ्यांचा व्यापारी, चिखलातील कमळ, माझी पत्नी रोहिणीस सलाम, कविता माझ्या मनातल्या आणि कॉन्ट्रिब्युशन ऑफ सायंटिस्ट टोवर्डस् मॅनकाईंड या सोनावणेे लिखित सात पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. संविधानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
डॉ. सबनीस म्हणाले, सोनावणे यांच्याकडे अनुभवांची समृद्धी आहे, लेखकाचे चिंतन आहे. बुद्धीचे वैभव आहे. बुद्ध, महावीरांचा वारसा आहे. या साऱ्याला मानवतावादी दृष्टिकोनाचा पाया असल्याने त्यांनी आंबेडकरी चळवळ आणि विचार यांचे तर्कशुद्ध पण परखड परीक्षण केले आहे, जे गरजेचे होते. सोनावणेे यांच्याकडे ते धाडस आहे, सत्याची चाड आहे. द्वंद्वात्मक जगात वावरताना जे संघर्ष जगभरात घडत आहेत त्यातून मानवता भयभीत झाली आहे. अशा वेळी भगवान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींनी दिलेले विचारधन कालसुसंगत पद्धतीने पुन्हा मांडण्याचे कार्य सोनावणेे यांनी केले आहे. प्रबोधनाला पुढे नेणारा हा मार्ग आहे आणि ही विधायक भूमिका आहे.
प्रास्ताविकात ॲड. सोनावणे यांनी स्वतःची जडणघडण सांगितली. मी शिक्षणासाठी नोकऱ्या केल्या, वकील झालो. मुंबईत आल्यावर व्यावसायिक कारकीर्द घडली. जगताना आलेले अनुभव सांगण्यातून लेखन सुरू झाले, असे ते म्हणाले. प्रत्येक पुस्तकाच्या निर्मिती आणि आशयाचीही त्यांनी माहिती दिली. काही भावी लेखन प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले, सोनावणे यांच्या लेखनातून सामाजिक भान व भोवतालचे वातावरण यांचे नेमके चित्र दिसते. मराठी साहित्यात एक नवे दालन उघडणारे दलित चळवळीचे परखड विश्लेषण त्यांनी केले जे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडेल. मराठी साहित्यात सोनावणे यांच्या लेखनाने नवे प्रबोधन दालन उघडले आहे. दलित चळवळीची सद्यस्थिती आणि चळवळीला आलेली उद्विग्नता तसेच झालेले अंध:पतन यांचे सोनावणे यांनी अक्षरशः शवविच्छेदन केले आहे,’.
प्राजक्ता सोनावणे यांनीही वडिलांविषयी मनोगत व्यक्त केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब जाधव यांनी स्वागतगीत सादर केले तर बी. आर. प्रक्षाळे यांनी आभार मानले.