प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली घोषणा
इंदापूर-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील या महत्त्वाच्या मतदारसंघात त्यांचा सामना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्ता भरणे यांच्याशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाची गर्दीच विधानसभा निवडणुकीचा निकाल सांगत आहे. 2019 मध्ये आमच्या पक्षाचे एकेक नेते आम्हाला सोडून जात होते. त्यावेळी मी राज्यात सांगत होतो, अ, बक, क गेला तरी चालेल कारण, शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आमच्याकडे आहे. शरद पवार नावाचे विद्यापीठ आमच्याकडे आहे.
त्यांनी एकदा नव्हे तर चारवेळा हे करुन दाखवले आहे. महाराष्ट्राला लढणारा नेता हवा असतो. दिल्लीवाल्यांनी जेव्हा केव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवार यांनी त्यांना मराठी स्वाभिमान दाखवण्याचे काम केले.
जयंत पाटील म्हणाले, आज राज्यातील स्वाभिमानी माणसे शरद पवार यांच्या मागे उभी आहेत. हर्षवर्धन पाटील 2019 साली काही कारणांमुळे भाजपमध्ये गेले. पण आता ते स्वगृही परत आलेत. त्यांनी यापूर्वीच येण्याची गरज होती. पण आमच्या घरी गर्दी थोडी जास्त होती. त्यामुळे त्यांना येता आले नाही. पण आता ते आलेत याचा फार मोठा आनंद आहे.
शरद पवार बहुजन समाजाचा विचार घेऊन मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रही त्यांच्यासोबत येत आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणूक पाहून सत्ताधाऱ्यांना आता बहिणी लाडक्या झाल्या आहेत.
जयंत पाटलांनी यावेळी व्यासपीठावरूनच हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली. ते म्हणाले, इंदापूरची जागा कोणत्याही स्थितीत आपल्याला निवडून आणायची आहे. उद्याच्या विधानसभेला इंदापूरचे हे महाशिवधनुष्य हर्षवन पाटील यांच्या प्रवेशामुळे सहज सुलभ झाले आहे. त्यांनीच हे धनुष्य हातात घ्यावे अशी आमची त्यांना विनंती आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय जाहीर झाल्याशिवाय मला यासंबंधीची घोषणा करता येणार नाही. पण त्यांचा प्रवेश करताना मी त्यांच्या हातात तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना याहून वेगळे काहीही सांगण्याची गरज मला वाटत नाही. जयंत पाटील यांच्या या विधानामुळे एकप्रकारे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरची उमेदवारीच दिल्याचे स्पष्ट झाले आहे.