पुणे-पुणे नवरात्रौ महोत्सवात आज भारतरत्न स्वारभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अजरामर अभंग, भजने, नाट्यगीते, ठुमरी आज श्रीनिवास भीमसेन जोशी व विराज श्रीनिवास जोशी या पितापुत्रांनी आपल्या बहारदार गायकीने पंडित भीमसेन जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला.
३०व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटनानंतर सायंकाळी ‘परंपरा’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडणारा कार्यक्रम पार पडला. आपल्या बहारदार गायकीने श्रीनिवास जोशी व विराज जोशी पितापुत्रांनी पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग, भैरवी, भजन सादर करून श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे श्रोत्यांची मने जिंकली. श्रोत्यांनी टाळ्यांची दाद देऊन कार्यक्रमात रंगत आणली.
अविनाश दिघे यांनी हार्मोनियम, पांडुरंग पवार यांनी तबला व माऊली टाकळकर यांनी त्यांना साथसंगत देऊन कार्यक्रमात रंग भरला.
शाम बजाय आज मुरलीया हे या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘दान करी रे गुरुधन अति पावन, श्रेयभाग जाण हा कुठूनि तुजसी लाभला’ या नाट्यगीतांच्या सादरीकरणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
‘जय दुर्गे दुर्गति परिहारिणी शंभूविदारिनी, माता भवानी जय जय दुर्गाती’ हे रण जंगला ताल सादर करून वाहवा मिळवली. ‘देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करून विठ्ठलाचे रूप उलगडले.
‘आगा वैकुंठीच्या राया’ ही भैरवी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले ख्यालगायन, आर्त ठुमरी, संतवाणी, बंदिश, नाट्यगीत, अभंग श्रीनिवास जोशी व विराज जोशी या पितापुत्रांनी आपल्या गायकीने पंडित भीमसेन जोशी यांना जणू आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला उत्तरोत्तर रंगत आली. रसिकांनी माना डोलवून व टाळ्यांची दाद देऊन प्रतिसाद दिला. याप्रसंगी श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांच्यासह सर्व कलाकारांचा सत्कार सागर बागुल यांनी केला.
नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.