नांदेड सिटीत सासू सून कौटुंबीक जबाबदारी स्नेह मिलन कार्यक्रम
जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे आणि भारतीय स्त्रीशक्ती , नांदेड सिटीच्या वतीने ‘महिलांचे हक्क- मध्यस्थ केंद्रांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र
पुणे : पूर्वी ‘ उत्तम कुटुंब व्यवस्था’ ही जागतिक स्तरावर भारताची ओळख होती, परंतु बदलत्या परिस्थितीमुळे कुटुंबे छोटी होत आहेत,त्याचे परिणाम मुलांवर संस्कार होण्यावर होत आहेत. कुटुंब व्यवस्था टिकली तरच खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती टिकू शकेल. परंतु वाढत्या अपेक्षा आणि त्यामुळे निर्माण होणारे कलह यामुळे कुटुंब व्यवस्था ढासळत असून त्यामुळे एक प्रकारे भारतीय संस्कृती लोप पावत असल्याची खंत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी व्यक्त केली.
नांदेड सिटी मध्ये सासू सून संमेलन अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या चर्चा सत्रामध्ये महेंद्र महाजन बोलत होते.जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा आणि सत्र न्यायालय पुणे आणि भारतीय स्त्रीशक्ती , नांदेड सिटीच्या वतीने ‘महिलांचे हक्क- मध्यस्थ केंद्रांची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.न्यायाधीश योगेश कोईनकर, भरोसा सेल पुणेच्या अनुराधा पाटील, न्यायाधीश सोनल पाटील, डॉ. अशोक वाकोडकर, अर्चना कौलगुड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
न्यायमूर्ती महेंद्र महाजन म्हणाले, समाज जरी पुढारलेला असला तरीही महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबलेले नाहीत. आज फक्त त्या अन्याय आणि अत्याचारांचे स्वरूप बदलले आहे. या संदर्भात महिला जरी सुशिक्षित झाल्या असल्या, तरी त्या पूर्णतः आपल्या अत्याचाराबद्दल बोलत नाहीत, त्यामुळे त्याचे अधिक वाईट परिणाम होतात. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महिलांनी कायद्याबाबत अधिक जागरूक असले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सोनल पाटील म्हणाल्या, महिलांच्या हक्काचे संरक्षण करणारे अनेक कायदे आज तयार झालेले आहेत ,अशा कायद्याची ओळख महिला वर्गाला व्हावी याकरताच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे .जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गतच मध्यस्थ केंद्र असून यामध्ये दोन्ही पक्षकारांना योग्य तो न्याय दिला जातो आणि नव्वद दिवसाच्या आत हे प्रकरण संपुष्टात येते.
त्यामुळे पक्षकारांच्या पैशाचा आणि वेळेचा अपव्यय होत नाही आणि मुख्य म्हणजे मनस्तापही होत नाही. समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून देखील आज शेकडो प्रकरणांचा निपटारा होत आहे. अशा या विविध योजनांचा लाभ महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अनुराधा पाटील म्हणाल्या, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये अनेकदा महिलाच कारणीभूत असल्याचे दिसून येते. याचे मूळ कारण चुकीचा अहंभाव आणि आपल्या हातामध्ये असलेल्या सत्तेचा गैरवापर हे आहे. जर महिलांनी महिलांबद्दलच असणारे गैरसमज दूर केले तर कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल.
योगेश कोईनकर म्हणाले, आज महिलांनी पारंपारिक शिक्षण घेऊन नोकरी करणे पुरेसे नाही तर त्यांनी आपल्या स्वसंरक्षणार्थ कायद्याचे ज्ञान घेणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या महिलांना कायद्याचे ज्ञान आहे, त्याच महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित आहेत, अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. कुटुंब कलह वाढण्यामध्ये नकारात्मक माध्यमांचाही मोठा वाटा आहे त्यामुळे माध्यमांचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठीही आपण प्रयत्न केले पाहिजेत.
समुपदेशक प्रशांत लोणकर, भारतीय स्त्री शक्ती जागरण, पुणेच्या अध्यक्षा संध्या देशपांडे, शिवाय वैजयंती ढवळे, मेधा वैशंपायन, सुवर्णा चोरगे, प्रज्ञा अग्निहोत्री यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मुग्धा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.अशोक वाकोडकर यांनी प्रास्ताविक केले. अर्चना कौलगुड यांनी भारतीय स्त्री शक्ती या संस्थेची व कार्याची माहिती दिली आणि आभार मानले. कार्यक्रमास नांदेड सिटी मधील जवळजवळ साडेतीनशे महिला उपस्थित होत्या.
नांदेड सिटी तील सामाजिक कार्यकर्ते जेष्ठ पत्रकार प्रकाश गोरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र महाजन यांचा सन्मान केला. भरोसा सेल पोलीस विभाग प्रमुख अनुराधा पाटील यांचा सन्मान नांदेड सिटीचे प्रमुख विश्वस्त समीर जाधवराव यांनी केला. सोनल पाटील यांचा सन्मान अर्चना कौलगुड यांनी केला तर न्या.योगेश कोईनकर यांचा सन्मान स्वानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर काळकर यांनी केला कौन्सिलर प्रशांत लोणकर यांचा सन्मान उद्योजक रवी कल्याणी यांनी केला.