बायडेन म्हणाले- इराणचा हल्ला फसला-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मंगळवारी रात्री सांगितले की, अमेरिकन सैन्य इस्रायलचे संरक्षण करेल. ते म्हणाले की, सध्या आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत, आतापर्यंत आम्हाला कळले आहे की इराणचा हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
इराणने आपल्यावर मिसाईल हल्ला केला असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, इराणने त्यांच्यावर जवळपास 180 मिसाईल्स डागले आहेत. यातील बहुतांश मिसाईल्सना चोख प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहितीही इस्रायलने दिली आहे.मिसाईल्सच्या या अखंड भडीमारामध्ये पश्चिम किनारपट्टीवरील एका पॅलेस्टीनी नागरिकाचा मृत्यू झाला आहे; तर मध्य इस्रायलमधील एका शाळेचं आणि तेल अव्हीव्हमधल्या एका रेस्टॉरंटचं मोठं नुकसान झालं आहे.
इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे की, “इराणने आजच्या रात्री फार मोठी चूक केली आहे. त्याला याची भरपाई करावी लागेल.”गेल्या काही दिवसांपासून इस्रायल चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या हल्ल्यापूर्वी इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले केले होते. या हवाई हल्ल्यांनंतर इस्रायलच्या लष्कराने प्रत्यक्ष जमिनीवरुनही लेबनॉनवर आक्रमण केलं. आपलं हिजबुल्लाह विरोधातील हे मैदानी आक्रमण ‘लिमीटेड, लोकलाईझ्ड आणि टार्गेटेड’ असेल, असेही इस्रायलने स्पष्ट केले होते.
दुसऱ्या बाजूला संयुक्त राष्ट्रांनी तसेच युरोपियन संघाने युद्धविरामसाठीचे आवाहन केलं आहे.
इराणने इस्रायलवर शंभरहून अधिक क्षेपणास्त्रं डागली. इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचं इराणनेही मान्य केले.त्यानंतर इस्रायलच्या संरक्षण दलांनी आपल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचा सल्ला दिला. संपूर्ण इस्रायलभर सायरन वाजत होते.
इराणच्या सरकारी माध्यमांनी एक निवेदन देऊन सांगितले की, IRGC ( इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स) ने इस्रायलवर डझनाहून अधिक क्षेपणास्त्रं डागली आहेत. जर या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तर आणखी हल्ला तीव्र केला जाईल असा इशाराही त्यांनी दिला.जुलै महिन्यात हमासचे नेते इस्माईल हानिये, हिजबुल्लाहचे नेते हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूच्या प्रत्युत्तरात ही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे IRGC ने म्हटले आहे.इराणने इस्रायलच्या महत्त्वाच्या तळांना लक्ष्य केले, याची विस्तृत माहिती नंतर देण्यात येईल असे IRGC ने सांगितले.
इस्रायल संरक्षण दलाने सांगितले आहे की आता हे हल्ले थांबले आहेत. या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झाली असल्याचे अद्याप तरी आम्हाला माहीत नाही. हा हल्ला आम्ही योग्यरीत्या हाताळला असे इस्रायल संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी म्हटले आहे.
भारताच्या इस्रायलमधील दुतावासाने तेथे राहाणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी एक मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. यानुसार इस्रायलमध्ये राहाणाऱ्या भारतीयांना सतर्क राहाणाऱ्याचे आणि संरक्षण नियमावलीचे पालन करण्यास सुचवले आहे.भारतीयांनी कोणताही अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षित आश्रयस्थानी थांबावे असे यात म्हटले आहे. तेथिल स्थितीवर आपलं सतत लक्ष असून भारतीय दुतावास इस्रायली अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असं यात नमूद केलं आहे.भारतीय नागरिकांनी दुतावासाशी तात्काळ संपर्क साधावा आणि स्वतःची नोंद करावी असं सांगितलं आहे. दुतावासाने +972-547520711, 543278392 या हेल्पलाईनही सुरू केल्या आहेत.