मुंबई -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आज नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी बोलताना अमित शाह यांनी महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.आता निवडणुकीनंतर महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच असेल, अमित शाहांनी स्पष्ट केले आणि अमित शाह म्हणाले महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात महायुतीला रोखण्याची ताकद कुठल्याही पक्षात नाही. यावेळी महाराष्ट्रात महायुतीच सरकार येईलच, परंतु 2029 साली आपल्याला एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे, असेही शाह म्हणाले.
महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपली निराशा झटकून टाका, कोणत्याही सर्व्हेचा विचार करू नका असे आवाहन यावेळी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना केले.महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील महाराष्ट्र जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. अमित शाहांचा हा सलग दोन आठवड्यातला दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा विश्वास दिला. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच – अमित शाह
यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, ‘महायुतीला रोखण्याची ताकद कोणत्याही पक्षात नाही. 2024 मध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित आहे. महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री भाजपचाच असेल असेही अमित शहा यांनी या बैठकीत स्पष्ट केले. तसेच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यास सक्षम असल्याचेही ते म्हणाले. महाराष्ट्रात निवडणूक जिंकल्यानंतर समान नागरी कायदा लागू करू असेही यावेळी बोलताना अमित शहा यांनी सांगितले.
देशाची दिशा आणि दशा बदलणारी निवडणूक- शाह
यावेळी बोलताना अमित शाह यांनी तिसऱ्यांदा भाजपची सत्ता येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी यांनी सलग तीन वेळा सरकार स्थापन करण्याचा विक्रम केला. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा आणि दशा बदलणारी निवडणूक आहे. ही निवडणूक महायुतीच जिंकणार आहे. निवडणुकीमध्ये पूर्ण उत्साहाने काम करा आणि मतदान वाढवा. 10 टक्के मते वाढल्यास भाजपच्या जागा किमान 20 ते 30 पर्यंत वाढू शकतात. नगरसेवक, आमदार व खासदारांच्या विरोधात असलेली नाराजी दूर करा. प्रत्येक बूथवर 10 कार्यकर्ते ठेवा जे दसऱ्यापासून प्रचार संपेपर्यंत बुथच्या कक्षेत फिरत राहतील. तसेच इतर पक्षातील लोक पक्षात आले तरी कार्यकर्त्यांना योग्य स्थान आणि सन्मान मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.