पुणे : ‘वो शाम कुछ अजीब थी’, ‘ना तुम हमे जानो’, ‘धीरे धीरे मचल ए दिले बेकरार’, ‘कही दीप जले कही दिल’ ‘ये नयन डरे डरे..’, ‘भवरा बडा नादान है’, ‘मी डोलकर डोलकर दर्याचा राजा’, ‘गोमू संगतीनं माझ्या तु येशील का’ अशा अवीट गोडी असलेल्या मराठी-हिंदी चित्रपट गीतांनी रसिकांना भुरळ घातली.
निमित्त होते संगीतकार-गायक हेमंतकुमार यांच्या स्मृतिदिनानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ‘ये नयन.. डरे.. डरे..’ या विशेष स्वरांजली सांगीतिक कार्यक्रमाचे. या विशेष सांगीतिक कार्यक्रमात रसिकांनी सुमधूर गीतांचा आनंद घेतला. आनंद सराफ, उदय नानिवडेकर, अविनाश वैजापूरकर आदी उपस्थित होते.
हेमंत कुमार यांची गायकी गाणारे सुप्रसिद्ध गझल गायक हेमंत खणंग प्रस्तुत कार्यक्रमात हेमंत खणंग यांच्यासह मधुरा घैसास-बेहेरे, शितल म्हसतकर, मनाली राजे यांनी चित्रपट गीते सादर केली. चित्रपट गीतांसंदर्भात विविध किस्से सांगत डॉ. भाग्यश्री कश्यप निवेदनाद्वारे गीतांच्या निर्मिती मागील अनेक किस्से सांगितले. गायन आणि संगीत क्षेत्रात अव्वल कामगिरी बजावणारे हेमंत कुमार यांची पुणेकर रसिकांना नव्याने ओळख झाली. पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपा देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचचे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले तर संयोजन अजित कुमठेकर यांनी केले.
धीर गंभीर, आर्त, घुमावदार, भावनेची कोवळीक दर्शविणारा आवाज असलेले सुप्रसिद्ध गायक-संगीतकार हेमंत कुमार यांच्या आवाजाची भुरळ पडलेल्या हेमंत खणंग यांनी आपल्या अनोख्या आवाजाने रसिकांना मोहित केले. रसिकांनी अनेक गीतांना भरभरून दाद दिली तर अनेकदा वन्स मोअरची मागणीही केली.
‘याद किया दिल ने कहा हो तुम’, ‘मेरा दिल ये पुकारे आजा’, ‘छुपा लो यूँ दिल मे प्यार’, ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’, ‘नींद ना मुझको आए’ आदी गीतांना रसिकांनी विशेष पसंती दर्शविली. ‘पुकार लो …. तुम्हारा इंतजार है’, ‘बेकरार करके हमे यूँ ना जाईये’, ‘तुम्हे याद होगा कभी हम मिले थे’, ‘ये अपना दिल तो आवारा’, ‘जाने वो कैसे लोग थे’, ‘राह बनी खुद मंझिल’, ‘जिंदगी प्यार की दो-चार घडी होती है’, ‘चली गोरी फिरचे मिलन को चली’ अशा अनेक गीतांचे सूर आणि स्वर उपस्थितांच्या मनात रूंजी घालत राहिले.

