पुणे – अर्धवट स्थितीत असलेल्या मेट्रोच्या उदघाटनाच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन भाजपचा प्रचार सरकारी म्हणजे जनतेच्या पैशाच्या जोरावर केला जात आहे, हा प्रकार म्हणजे, आयजी च्या जीवावर बायजी उदार अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (रविवारी) केली.
मेट्रो रेल्वे च्या प्रकल्पाची कामे अर्धवट स्थितीत आहेछ. पादचारी पूल, मेट्रो स्टेशनला जोडणारी वाहतूक व्यवस्था आदी अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. तरीही या प्रकल्पाचे पाचव्यांदा उदघाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार होते. या करीता स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार होती, त्या सभेच्या मांडव तसेच अन्य तयारीसाठी आणि वर्तमानपत्रांमधील जाहिरातींसाठी सरकारच्या तिजोरीतून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. हा पैसा भाजप देणार आहे का? असा सवाल मोहन जोशी यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना विचारला आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, पावसामुळे मोदी यांची सभा रद्द करण्यात येत आहे. तर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणतात की, वाहतूक कोंडी होऊन पुणेकरांना त्रास होऊ नये या करीता सभा रद्द केली. ही कारणे विसंगत आणि पुणेकरांची दिशाभूल करणारी आहेत. गेल्यावर्षी १ऑगस्ट रोजी पंतप्रधान पुण्यात आले तेव्हा शहराच्या मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आदी भागांमधील वाहतूक काही तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मोहोळ यांना ते आठवत नाही का? अशीही विचारणा मोहन जोशी यांनी केली आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्प ही काँग्रेसची योजना. या करीता २०१४ साला पर्यंत केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्या विविध खात्यांची मंजुरी घेण्याचे काम माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले होते. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने भाजपचे सरकार आले आणि भाजपच्या नेत्यांनी प्रकल्प लांबवत नेला. १६ साली पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. आठ वर्षे झाली, तरी प्रकल्प अर्धवट अवस्थेतच आहे आणि अशा अर्धवट अवस्थेतील प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान वारंवार करत आहेत, अशी टीका मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सरकारचा पैसा आणि सरकारी यंत्रणा वापरून पक्षाचा प्रचार कसा करून घ्यावा, हे भाजपकडून शिकण्यासारखे आहे, असा शेरा मोहन जोशी यांनी भाजपला उद्देशून भारला आहे.