रत्नागिरी:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम वादात राहणाऱ्या भाजप आमदार नीतेश राणे यांचा चांगलाच समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्याने महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला. पण त्यांचे चिरंजीव हल्ली ज्या पद्धतीने बोलतात, ते पाहता महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज या लोकांची भाषा कशा प्रकारची आहे ते पाहा, भारत सर्वधर्मियांचा देश आहे. येथे हिंदू, शिख व मुस्लीम गुण्यागोविंदाने राहतात. एका केंद्रीय मंत्र्यांची मुले मुस्लीम समाजाविषयी ज्या पद्धतीने जाहीर गरळ ओकतात, पण त्यानंतरही त्यांना आवर घातली जात नाही. उलट टीव्हीवर त्यांनी बोलावे याची काळजी घेतली जाते. याचा अर्थ सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. पण जेव्हा सत्ता एखाद्याच्या डोक्यात जाते, तेव्हा जनता एक होऊन त्यांची जागा दाखवते,असे ते म्हणाले.
शरद पवार यांची सोमवारी रत्नागिरीच्या चिपळून येथे सभा झाली. या सभेत बोलताना पवारांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या वादग्रस्त विधाने करणाऱ्या मुलांचा विशेषतः भाजप आमदार नीतेश राणे यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, सत्ता येते व जाते. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचे असतात. आणि सत्ता नसेल तेव्हा चिंता करायची नसते. काम करत राहायचे असते. संयम ठेवायचा असतो.
मी स्वतः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. माझ्याही घरात एक मुलगी आहे. देशाच्या संसदेत चांगले काम करण्याचा तिचा नावलौकीक आहे. विनम्रपणा हा तिचा लौकीक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री दिला. या मुख्यमंत्र्याने माझ्यासोबतही काम केले. पण त्यावर मला काही बोलायचे नाही. पण त्यांचे चिरंजीव सध्या ज्या पद्धतीने बोलतात, ते पाहता मी महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा कशा प्रकराची आहे? समाजात सर्व जाती धर्माचे लोक राहतात हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे.
शिवाजी महाराजांचा पुतळाही कोसळतो :म्हणजे भ्रष्टाचार कुठल्या लेव्हलला पोहोचला हे दिसते—
शरद पवार पुढे म्हणाले, आज ज्यांच्या हाती सत्ता आहे, त्या सत्तेचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवरही. सिंधुदुर्गात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. तो पडला. राज्य सरकारने सांगितले वाऱ्यामुळे पुतळा पडला. मुंबईला शिवाजी पार्कात शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. इंडिया गेटजवळ पुतळा आहे. हे पुतळे 80 वर्षापूर्वीचे आहेत. समुद्राजवळ आहेत. भरपूर वारा आहे. त्या पुतळ्यांना कधी धक्का बसला नाही. आणि सिंधुदुर्गातील पुतळा पडतो. वाऱ्यामुळे? काय चाललंय हे. पुतळ्यातही भ्रष्टाचार झाला. महाराजांचा पुतळा आणि त्यातही पैसे खाणे सोडत नाहीत. कसे लोक आहेत. महाराजांनी मावळ्यांना आदेश दिला की शेतातून जात असाल तर पिकाच्या देठाला हात लागता कामा नये. सर्वांना सोबत घेऊन जाण्यास सांगणारे शिवाजी महाराज आणि त्यांचा पुतळा. भ्रष्टाचार कुठल्या लेव्हलला पोहोचला हे यातून दिसून येते, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी पुण्यात एका खडड्यात पडलेल्या ट्रकच्या घटनेवरही भाष्य केले. पुण्यात 4 दिवसांपूर्वी एक अपघात झाला. पुणे महापालिकेचा एक ट्रक रस्त्याने जात होता. तो अचानक एका खड्ड्यात पडला. ही भ्रष्टाचाराची घटना आहे. लोकांना भ्रष्टाचार कुठे व किती करावा याची काहीही मर्यादा राहिली नाही. याची किंमत सत्ताधाऱ्यांना चुकवावी लागेल. मी गाड्याने प्रवास करतो हे मला माहिती आहे. मी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून या रस्त्याची माहिती देणार आहे, असे शरद पवार म्हणाले.