पुणे : प्रभाजी महान आणि प्रतिभावान कलाकार होत्या. त्यांचा व माझा अनेक वर्षांचा स्नेह होता. आमचे नाते मैत्रीपूर्ण होते. ज्यात हसी, मजाक, प्यार, गुस्सा यांचा मिलाफ होता. त्या सतत गायन, लेखन, मनन, चिंतन, अभ्यास यात व्यग्र असत. संगीत हेच त्यांचे पहिले प्रेम होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी काढले. ज्यांच्याकडून विद्या मिळवावी, ज्यांना गुरूस्थानी मानावे असे कलाकार आता फार कमी राहिलेले आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
डॉ. प्रभा अत्रे शिष्य परिवारातर्फे स्वरयोगिनी, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या साहित्य, कला आणि संगीत या क्षेत्रांमधील कार्यावर आधारित ‘स्वरयोगिनी : भारतीय संगीतातील नवोन्मेष’ या महोत्सवातील पहिल्या दिवशी (दि. 21) प्रभा अत्रे लिखित ‘स्वरमयी’ पुस्तकाच्या पाचव्या आणि ‘सुस्वराली’ या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे लोकार्पण झाले. त्या वेळी पंडित चौरसिया बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक विजय कुवळेकर, डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. अशोक वळसंगकर, डॉ. मदन फडणीस, ॲड. किरण कोठाडिया, फाऊंडेशनचे कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे, डॉ. मनिषा रवी प्रकाश व्यासपीठावर होते. ज्येष्ठ कवी, साहित्यिक, समीक्षक डॉ. अशोक वाजपेयी दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले होते. बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. प्रभा अत्रे यांनी भारतीय संगीतविषयक केलेल्या व्याख्यांनाचा समावेश असलेल्या ‘आलोक’ या 19 भागांच्या दृकश्राव्य मालिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे लोकार्पण या प्रसंगी करण्यात आले.
डॉ. अशोक वाजपेयी म्हणाले, प्रभा अत्रे या इतर संगीतकारांपेक्षा वेगळ्या होत्या. त्यांच्यामध्ये अनेक दुर्लभ गुण होते. त्या उत्तम गायिका, संगीतकार, लेखिका, अभ्यासक होत्या. त्यांचे संगीताविषयीचे लिखाण अतिशय विचारपूर्वक केलेले असे. व्यावहारिक संगीतकाराच्या भूमिकेतून आलेल्या अनुभवातून त्यांचे विचार कागदावर उतरत असल्याने त्यात प्रामाणिकपणा व विश्वसनीयता होती.
प्रभाताई अत्रे यांच्या आठवणींना उजाळा देताना विजय कुवळेकर म्हणाले, डॉ. प्रभा अत्रे या अत्यंत साध्या आणि तेजस्वी कलाकार होत्या. त्यांच्या आंतरिक तेजाची प्रभा त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून जाणवत असे. कलाकार म्हणून असलेल्या मोठेपणाचे ओझे त्यांनी कधीच वागविले नाही. प्रतिभावंत कलाकार असूनही माणूस म्हणून त्या खूप महान होत्या. कसोटीच्या प्रसंगातही त्यांनी स्वत्व व सत्व सोडले नाही. संगीत क्षेत्रातील शुद्धपण जपले जावे याकरीता त्या स्पष्ट भाष्य करीत. कृतज्ञता हा त्यांच्या स्वभावाचा लोभसवाणा भाग होता. त्या संवेदनशीलही होत्या. परंपरेच्या चौकटीच्या भिंती न बांधता प्रभाताईंनी गायन क्षेत्रात काळानुरूप बदल स्वीकारात नवनवीन प्रयोगही केले. त्या अपूर्णत्वाची जाण ठेवून पूर्णत्वाचा ध्यास घेतलेल्या कलाकार होत्या.
डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सविच डॉ. भारती एम. डी. यांनी ‘स्वरमयी’ आणि ‘सुस्वरली’ पुस्तकांच्या प्रकाशनाविषयी तसेच फाऊंडेशनच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.
मान्यवरांचे सत्कार अशोक वळसंगकर आणि डॉ. मनिषा रवी प्रकाश यांनी केले. सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले तर आभार प्रसाद भडसावळे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात डॉ. प्रभा अत्रे यांच्या पुस्तकांमधील निवडक सांगीतिक लेखांचे अभिवाचन आणि त्यांनी रचलेल्या वेगळ्या घाटातील बंदिशींवर आधारित सांगीतिक सादरीकरण झाले. यात डॉ. केशवचैतन्य कुंटे, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी तसेच डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य डॉ. चेतना पाठक व डॉ. अतिंद्र सरवडिकर यांचा सहभाग होता. कलाकारांना माधव मोडक (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कलाकारांचे स्वागत रघुवीर कुलकर्णी, अशोक वळसंगकर यांनी केले.
प्रभाताईंचे पहिले प्रेम संगीत : पंडित हरिप्रसाद चौरसिया
Date:

