काँग्रेसच्या आंदोलनानंतर भाजपा खासदार अनिल बोंडेवर अमरातीवतीमध्ये गुन्हा दाखल.
मुंबई/अमरावती, दि. १८ सप्टेंबर
भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. बोंडे यांचे विधान समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करणारे आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्यामुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका निर्माण झाला असून अनिल बोंडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्यासाठी अमरावतीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अनिल बोंडेंवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना गराडा घालण्यात आला. अनिल बोंडे हे गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, काँग्रेसच्या नेत्यांविरोधात हल्ले व्हावेत, असा प्रयत्न ते करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचा तात्काळ अटक करावी, असे ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि दंगली भडकवण्याचा अनिल बोंडे यांचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या मागणीची दखल घेऊन पोलीसांनी खासदार अनिल बोंडे यांच्याविरोधात कलम १९२, ३५१(२) आणि ३५६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी माजी मंत्री आमदार ॲड.यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. सुनिल देशमुख, माजी आमदार विरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेस शहराध्यक्ष बबलु शेखावत,प्रवक्ते मिलींद चिमोटे, हरीष मोरे, हरीभाऊ मोहोड, भैय्या पवार, प्रविण मनोहर, अमित गावंडे, वैभव देशमुख, शैलेष काळबांडे, जयश्री वानखडे, अंजली ठाकरे, शोभा शिंदे, बंडु हिवसे, राजु बोडखे यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.