राज्यभरातील कवींच्या समकालीन अभिव्यक्तीचे दर्शन
पुणे फेस्टिव्हल अंतर्गत मराठी कविसंमेलनाला रसिकांची भरभरून दाद
समकालीन वास्तवाला थेट भिडणारे, भेदक वस्तुस्थितीवर प्रकाश टाकणारे आणि प्रस्थापितांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्न करणारे, असे वातावरण रसिकांनी गुरुवारी रात्री कवीसंमेलनाच्या निमित्ताने अनुभवले आणि राज्याच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणार्या कवींना मनमुराद दादही दिली.
३६व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत निमंत्रितांचे कवीसंमेलन गुरुवारी रात्री बालगंधर्व रंगमंदिरात रंगले. ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या नर्मविनोदी सूत्रसंचालनाने कवीसंमेलनाची खुमारी वाढवली.
शरद धनगर (अमळनेर), आबीद शेख (पुसद), अंजली ढमाळ, वैशाली पतंगे (पुणे), म. भा. चव्हाण, नितीन देशमुख (चांदूरबाजार),नारायण पुरी (नांदेड), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी), वि. दा. पिंगळे, विजय पोहनेरकर (औरंगाबाद), इंद्रजीत घुले, ज्योत्स्ना राजपूत आदी कवींनी विविध भावभावनांचा जणु एक कोलाज रसिकांपुढे सादर केला. या कवितांमधून विषयांप्रमाणेच बोलींचेही वैविध्य प्रकट झाले.
नितीन देशमुख यांच्या
‘ओढ वरवर नको, आतली पाहिजे
माणसे आपली, वाटली पाहिजे’
या कवितेने रसिकमनांची सुरवातीलाच पकड घेतली. देशमुख यांच्या कवितेतील संवेदनशीलतेने आणि त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने त्यांच्या प्रत्येक कवितेने टाळ्यांच्या कडकडाटात वन्समोअर घेतले. ‘मी कधीपासून माझ्याच शोधात आहे’, हा कवीला पडलेला प्रश्न आणि त्यामागील सामाजिक तुटलेपणाची भावना समर्थपणे व्यक्त झाली होती.
‘कोण आहे मी, कसा आहे
काय याचा भरवसा आहे’,
या ओळीतूनही व्यक्तीमधील दुभंगलेपण कवीने व्यक्त केले होते.
शरद धनगर यांच्या अहिराणी बोलीतील कवितांनी श्रोते प्रभावित झाले.
‘मी जगावर एकतर्फी प्रेम करतो, करत राहीन…’ ही त्यांची कविता विशेष दाद मिळवून गेली.
ज्योत्स्ना राजपूत यांच्या तक्रार या शीर्षकाच्या कवितेत लाट आणि काठ यांचा संवाद रंगविण्यात आला होता. इंद्रजीत घुले यांची थोडा वेळ देत जा, ही कविताही सध्याच्या पराकोटीच्या व्यस्त आणि गतिमान जगण्याचे संदर्भ घेऊन आली होती.
म. भा. चव्हाण यांच्या कवितेतील
‘गर्दीशिवाय दुसरे देशात काय आहे’, या प्रश्नाने श्रोत्यांना अस्वस्थ केले.
‘येईल वेळ तेव्हा आम्ही बघून घेऊ
मधुमास संपला की, ढग पेटवून देऊ’,
अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती.
‘ओठात आज माझ्या स्वातंत्र्यगान आहे
माझ्या महान देशा, मी बंदिवान आहे’,
या कवितेतील वेदनी रसिकांना स्पर्शून गेली.
‘मागू नकोस माझा संदर्भ मागचा तू
मागेच फाटलेले मी एक पान आहे’,
या वास्तवाची जाणीवही त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली होती. ‘ते घाव घालताना मी वाहवा म्हणालो’, ही त्यांची ओळही लक्षणीय ठरली.
वैशाली पतंगे यांनी सावित्रीबाई फुले यांना ‘पत्ररूप सावित्री’ असे लिहिलेले पत्र दाद मिळवून गेले. आबीद शेख यांनी सादर केलेल्या कविताही रसिकांनी उचलून धरल्या. ‘मी पेरले पिलांच्या चोचीमधील गाणे’, या त्यांच्या ओळी विशेष लक्षात राहिल्या. इंद्रजीत घुले यांच्या विनोदाची पेरणी केलेल्या कवितांनी मजा आणली. लग्नाचे जेवण (प्रेयसीच्या) या कवितेने वन्समोअर घेतला. अंजली ढमाळ यांच्या ‘जपलेल्या आणि रापलेल्या बायकां’ची कविता, त्यातील दाहक वास्तव दर्शनाने रसिकांना अस्वस्थ करून गेली.
वि. दा. पिंगळे यांनी सादर केलेल्या ‘बारामतीचे पाणी’ या कवितेने शीर्षकापासून लक्ष वेधले.
‘बारामतीच्या पाण्याशिवाय सत्तेचं पीक येत नाही’, अशा ओळी टाळ्या घेऊन गेल्या.
कवी पोहनेरकर यांच्या चोराची भेट या कवितेने धमाल उडवून दिली. तसेच घुंगरू, तो आणि ती, बेंदूर सणाची कविता, सहरातले व्हिलेज अशा कवितांनीही रसिकांना अंतर्मुख केले. रामदास फुटाणे यांनी कोरोनाची पार्श्वभूमी घेऊन, सादर केलेल्या कवितेने या रंगतदार कवीसंमेलनाची सांगता झाली.
पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड तसेच माजी पोलिस अधिकारी चंद्रशेखर दैठणकर यांच्या हस्ते सर्व कवींचा सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरातील पुणे फेस्टिव्हल कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू यांनी स्वागत केले.