पुणे, दि. १२ : उत्तम गुणवत्तेचे चंद्रपूर जिल्ह्यातील सागवानी लाकूड महाराष्ट्र वनविकास महामंडळामार्फत पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती महामंडळाच्यावतीने देण्यात आली आहे.
वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांच्या पुढाकाराने दिल्ली येथील राम मंदिर, उपराष्ट्रपती भवन, नवीन संसदेपाठोपाठ आता प्रधानमंत्री कार्यालयासाठीही चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरले जाणार असून महामंडळाच्या बल्लारशा डेपोतून हे सागवान दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. याच गुणवत्तेचे सागवानी लाकूड पुण्यातही विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
एक्झिक्युटिव्ह एनक्लेव्ह या नवी दिल्लीमधील पंतप्रधान कार्यालयातील केंद्रीय सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा सचिवालय याकरिता लार्सन अँड टुर्बो यांच्याकडून नमुना म्हणून सागवानाची मागणी प्रायोगिक तत्त्वावर प्राप्त झाली होती. त्यांच्याकडून बल्लारशा येथे सागाच्या गोल लाकूड आणि चिराण मालाची गुणवत्ता तपासणी केल्यावर ते उत्तम दर्जाचे आढळले. त्यानुसार या सर्व प्रकल्पाकरिता वनविकास महामंडळाकडे मागणी प्राप्त झाली आहे, अशी माहिती वनविकास महामंडळाचे चंद्रपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक तथा डेपो प्रमुख सुमित कुमार यांनी दिली.
सागवानी लाकडाची वैशिष्ट्ये:
सागाचे लाकुड मजबूतीसाठी ओळखले जाते. सागवान लाकडात टेक्टोनिक नावाचे तेल असते. याला नैसर्गिक चमक असल्याने पॉलिश करण्याची गरज नसते. या लाकडाला त्यातील तेलामुळे सुमारे ६०० वर्षे कीड लागत नाही, ऊन किंवा पावसाचा कमी परिणाम होतो. तेल आणि रबराचे प्रमाण अधिक असल्यामुळे सागवान अधिक मजबूत स्थितीत राहते. यातच चंद्रपूर जिल्ह्यातील लाकूड हे सोनेरी छटेत असल्यामुळे आकर्षक दिसते.
सर्वसामान्य ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना उत्त्तम गुणवत्तेचे सागवानी लाकूड पुण्यात देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी वनविकास महामंडळाअंतर्गत वन प्रकल्प विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापक विपणन ४ था मजला, वन भवन, भांबुर्डा वन वसाहत, गोखले नगर, पुणे या कार्यालयाशी दूरध्वनी क्र. ०२०- २६८५०७६५, ई-मेल पत्ता – rm.fdcmpune@gmail.com या पत्त्यावर किंवा चंद्रपूर येथील प्रादेशिक व्यवस्थापक यांचा भ्रमणध्वनी क्र. ९४१२९९६७५३ किंवा पुणे येथील सहाय्यक व्यवस्थापक अश्विनी सोनावणे यांच्याशी भ्रमणध्वनी क्र. ८३७८०४१८४३ वर संपर्क साधावा, असे श्रीमती सोनवणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000