पिंपरी, पुणे (दि. ०९ सप्टेंबर २०२४) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल तर्फे आयोजित करण्यात आली होती. देशभरातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ही स्पर्धा प्रेरित करते.
या स्पर्धेमध्ये ३५० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी तीस संघांची पुढच्या फेरीसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध सामाजिक समस्यांचे तांत्रिक दृष्टिकोनातून निराकरण करण्याचा प्रयत्न केला.
विविध नामांकित कंपन्यातील तज्ज्ञ, अनुभवी परीक्षक डॉ. बी. सत्यनारायण, श्रीकांत सावलकर, राहुल शेलार, ललित पाटील, दीपक रसाळ व जयवंत देवरे यांनी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बी. सत्यनारायण यांनी तरुणांना संशोधनाचे महत्त्व सांगून प्रोत्साहित केले. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख डॉ. अर्चना चौगुले, विजयलक्ष्मी कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शिवगंगा गव्हाणे आभार मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.