संसदेत राडा करणारे दोन जण आणि संसदेबाहेर घोषणा देणारे दोन (एका महिलेसह) असे मिळून चार जण सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. संसदेत राडा करणाऱ्या दोन तरुणांची नावं सागर शर्मा आणि डी. मनोरंजन (३५) अशी आहेत. तर संसदेबाहेर नीलम (४२) आणि अमोल शिंदे (२५) या दोघांना पोलिसांनी पकडलं. संसदेबाहेर नीलम आणि अमोल शिंदे या दोघांनी “तानाशाही नहीं चलेगी (हुकुमशाही चालणार नाही), मणिपूरवासियांना न्याय द्या. महिलांवरील अत्याचार सहन करणार नाही. भारत माता की जय, हुकुमशाही बंद करा. जय भीम, जय भारत, वंदे मातरम.” अशा घोषणा दिल्या होत्या.
संसदेत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आजही सभागृहाचे कामकाज सुरू होते. शून्य तासात पाच मिनिटे बाकी होती. तेवढ्यात मागून आवाज झाला. हा आवाज सामान्य नव्हता. प्रत्यक्षात एका तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून खाली उडी मारली होती. दरम्यान, आणखी एक तरुणही उडी मारून खाली आला. काही वेळातच आरोपी एका बाकावरून दुसऱ्या बाकावर उडी मारत पुढे जाऊ लागला. पकडण्यापूर्वी त्याने बुटातून काहीतरी काढून फवारणी सुरू केली. काही वेळातच संसदेच्या सभागृहात प्रचंड धूर पसरला.
यावेळी संसदेबाहेरही एक घटना घडली. संसदेबाहेर एका तरुण आणि महिलेने गॅस फवारला आणि घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेबाहेरही एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात एकूण 6 जणांचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, तर इतर 2 आरोपींचा शोध सुरू आहे.
कोण आहेत आरोपी?
पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. लोकसभेत धाडस दाखविलेल्या तरुणांची नावे सागर आणि मनोरंजन अशी आहेत. तर ज्या आरोपींना सभागृहाबाहेरून अटक करण्यात आली त्यांची नीलम आणि अमोल शिंदे अशी नावे आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदेच्या बाहेर आणि आत गोंधळ घालणारे चार आरोपी एकमेकांना ओळखतात. या आरोपींचा एकच उद्देश होता. हे चौघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना भेटल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्यांनी संसदेवर हल्ला करण्याचा कट आखला.
प्रेक्षक गॅलरीतून आरोपीने मारली सभागृहात उडी
लोकसभेत धूर फवारणारा सागर शर्मा म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या पासवर प्रेक्षक गॅलरीत आला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघांनी प्रेक्षक गॅलरीतून चेंबरमध्ये उडी मारली. खुर्चीवर असलेले भाजपचे सदस्य राजेंद्र अग्रवाल यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब केले. संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्यानंतर खासदार प्रताप सिम्हा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले. त्याचवेळी आरोपींना सुरक्षा दलांच्या ताब्यात देण्यापूर्वी खासदारांनी त्यांना बेदम मारहाण केली.
अध्यक्षांनी दिले प्रवेश पास रद्द करण्याचे आदेश
या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माजी खासदार आणि खासदारांच्या स्वीय सहायकांचे संसद भवनातील प्रवेश पास रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी ओम बिर्ला यांनी सर्व पक्षांच्या खासदारांची बैठकही बोलावली आहे. जेडीयूचे खासदार रामप्रीत मंडल यांनी सांगितले की, तरुणांनी शूजमध्ये गॅसचे कॅन लपवले होते आणि लोकसभेच्या चेंबरमध्ये पिवळ्या रंगाचा गॅस फवारला होता.

