सांगली- काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी गुरुवारी सकाळी काँग्रेसचे नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी सांगली येथे जाऊन काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी आयोजित सभेत राहुल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोसळलेल्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीवर सडकून टीका केली. चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे ते म्हणाले.मोदी नेमकी कशा कशाबद्दल माफी मागणार आहेत? देशातील सगळी कंत्राटं ते केवळ दोन माणसांनाच देतात. त्याबद्दल ते माफी मागणार का? शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले. त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांपैकी ७०० जणांचा जीव गेला. त्याबद्दल मोदी माफी मागणार का? नोटबंदी, चुकीच्या जीएसटीमुळे छोटे, मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले. अनेकांचा रोजगार गेला. त्याबद्दल मोदी माफी मागणार का, अशी प्रश्नांची सरबत्तीच राहुल यांनी केली.
ही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागून गेले. आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. म्हणजे मोदींना चूक झाल्याचं मान्य आहे का?, असा सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारला. मोदींनी माफी नेमकी कशाबद्दल मागितली? संघाच्या माणसाला अनुभन नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं त्याबद्दल मोदींनी माफी मागितली की पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, त्याबद्दल मोदींनी क्षमा मागितली, असे प्रश्न राहुल यांनी सांगलीतील सभेत विचारले. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळला. त्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्याच हस्ते झाला. पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या मोदींनी माफी मागितली. तोच धागा पकडत राहुल गांधी मोदींवर तुटून पडले.’मी शिवाजी महाराजांची माफी मागतो, असं मोदी म्हणाल्याचं माझ्या वाचनात आलं. त्यांनी माफी नेमकी का मागितली? त्यामागची कारणं काय? ती वेगवेगळी असू शकतात. संघाच्या माणसाला कंत्राट दिलं म्हणून त्यांनी माफी मागितली का? कंत्राट मेरिटवर द्यायला हवं असं त्यांना वाटत असेल.
दुसरा मुद्दा भ्रष्टाचार, चोरीचा असू शकतो. त्यामुळे त्यांनी माफी मागितली असेल. ज्याला कंत्राट दिलं, त्यानं भ्रष्टाचार केला, याबद्दल मोदींनी माफी मागितली का? तिसरा मुद्दा हलगर्जीपणाचा असू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची मूर्ती उभारताना इतकीही काळजी घेतली गेली नाही की ती उभी राहील? कदाचित या भावनेतून मोदींनी माफी मागितली असेल, अशा शब्दांत राहुल गांधींनी माफीबद्दल तीन प्रश्न विचारले.छत्रपती शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे पडतो. या सरकारनं शिवरायांचा अपमान केला आहे. त्यामुळे मोदींनी केवळ शिवरायांची नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी, अशी मागणी राहुल यांनी केली.
मी भारत जोडो यात्रेत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चाललो. मी एकटा नव्हे तर माझ्यासोबत लाखो लोक चालले होते. महाराष्ट्रातही केरळ, तेलंगाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी सर्वच राज्यांतील लोक चालले होते. हे लोक देशाच्या कानाकोपऱ्यात द्वेष पसरवत आहेत. यात काही नवी नाही. ते पूर्वीपासूनच असे करत आहेत. हीच लढाई इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनी लढली होती. तीच लढाई आज काँग्रेस लढत आहेत. याच महापुरुषांची विचारधारा पाहिली तर त्याचे प्रतिबिंब भारतीय संविधानात दिसते. पण भाजपच्या नेत्यांची संविधान संपवायचे आहे. त्यांनी सर्वच स्वायत्त संस्थांमध्ये आपले लोक घुसवलेत, असेही राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.
मणिपूरमध्ये भाजपच्या लोकांनी लावली -भाजपा धर्माच्या,जातीच्या नावाने माणसा माणसात द्वेषाचे वातावरण निर्माण करतोय —-आम्हाला सर्वांना जोडून पुढे न्यायचे आहे. त्यांना निवडणुकीत निवडक लोकांना फायदा पोहोचवायचा आहे. मागासांनी मागास, दलित दलित रहावेत, अशी त्यांची इच्छा आहे. जातीचा रचना जशी आहे, तशीच रहावी अशी त्यांची इच्छा आहे. ही आमच्या दोघांमध्ये लढाई आहे.भाजपकडून द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे. एका धर्माला दुसऱ्या धर्माशी, एकाजातीला दुसऱ्या जातीशी लढायला लावतात. मणिपूर बघा, भारताच्या इतिहासात पहिल्यांदा नागरी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. दीडवर्ष लोटले भारताचे पंतप्रधान तिथे गेले नाहीत, कारण तिथे भाजपाच्या लोकांनी आग लावली आहे. पीएम मोदी गेल्या वर्षभरात मणिपूरला गेले नाहीत, असेही राहुल गांधी म्हणाले.

