मुंबई-आगामी विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नवा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. सीबीआयने गुन्हा दाखल करताच देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवत अशा धमक्या व दबावाला आपण भीक घालणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.
अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाच्या काळात भाजप नेते गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या तत्कालीन पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. सीबीआयने याच प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी, कथित 100 कोटींच्या वसुलीच्या चौकशीचा ससेमिराही अनिल देशमुखांच्या मागे आहे. या प्रकरणी त्यांनी तुरुंगवासही भोगला आहे. त्यानंतर आता पुन्हा जळगावच्या प्रकरणात सीबीआयने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुखांनी बुधवारी एका ट्विटद्वारे सीबीआयच्या कारवाईची माहिती दिली. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्रही डागले. ते म्हणाले की, धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस, माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. पण या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे.
महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असे देशमुख आपला संताप व्यक्त करताना म्हणाले.