केशव शंखनाद पथक ८ वा वर्धापन दिन आणि केशव सन्मान पुरस्कार प्रदान सोहळा : विहिंप केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर आणि पुनीत बालन यांची उपस्थिती
पुणे : केशव शंखनाद पथकाच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त केशव सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठलराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार ह.भ.प. देवेंद्र महाराज निढाळकर यांना केशव सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रविवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे, अशी माहिती केशव शंखनाद पथकाचे अध्यक्ष नितीन महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी केशव शंखनाद पथकाचे खजिनदार रणजीत हगवणे, व्यवस्थापक काळुराम डोमाळे, महिला प्रमुख शीला गिरमे, सल्लागार सुहास मदनलाल, सदस्य शैलेंद्र भालेराव उपस्थित होते.
पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
नितीन महाजन म्हणाले, हिंदुस्थानातील पहिले आणि एकमेव शंख वादकांचे केशव शंखनाद पथक आहे. गणेशोत्सवात शंखनाद करण्याच्या उद्देशाने २०१७ मध्ये शंखनाद पथकाचा सराव ओंकारेश्वर मंदिरात सुरू झाला. त्यावेळी संख्या अगदीच कमी होती. आम्ही शंखनादाविषयी मार्गदर्शन करित आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदे सांगून लोकांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर शंख वादकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. धार्मिक, पौराणिक वाद्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व आहे त्याचा प्रसारक करण्याच्या उद्देशाने संस्थेच्या वतीने मोफत शंख वादन प्रशिक्षण वर्ग देखील सुरू झाले, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
समाजात संघटितपणे आणि समर्पित वृत्तीने धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तीला केशव शंखनाद पथक पुरस्कार देण्यात येतो. निढाळकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून आणि श्री विठ्ठल राज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संतांची शिकवण आणि संत परंपरा जनसामान्यात रुजविण्याचे काम केले आहे.