दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाची महानगर आयुक्तांशी विकास कामांवर चर्चा
पुणे / पिंपरी (दि.२) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध विकास कामांची रूपरेषा आखण्यात येत आहेत. या विकासात्मक कामात भागीदारी तत्त्वावर योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून सोमवारी दक्षिण कोरियाच्या बुसान मेट्रोपॉलिटीन कॉर्पोरेशनच्या (बीएमसी) शिष्टमंडळाने प्राधिकरणाच्या कार्यालयास भेट देत विविध विषयावर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यादरम्यान दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना आगामी काळात संयुक्तपणे कुठली विकास कामे करता येऊ शकतात, या संदर्भात माहिती दिली.
पीएमआरडीएअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांसह आगामी काळातील प्रस्तावित विकासात्मक योजनांसंदर्भात अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी बुसान कार्पोरेशनच्या शिष्टमंडळाला प्राथमिक माहिती दिली. यात प्रामुख्याने पीएमआरडीएने उभारलेल्या गृहप्रकल्पांसह प्रस्तावित रिंग रोड, विविध विकासात्मक प्रकल्प आणि कामासंदर्भात दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाने श्री. सिंगला यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यादरम्यान शिष्टमंडळाने महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासोबत पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॉलिटीन कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आगामी काळात कुठली विकास कामे करता येऊ शकतात, याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी पीएमआरडीएच्या वतीने दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले.
यावेळी पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, बुसान मेट्रोपॉलिटीन कॉर्पोरेशन नियोजन व्यवस्थापन कार्यालयाचे जिन-वोन जंग, धोरणात्मक नियोजन विभागाचे म्युंग-युन ह्वांग, उपमहाव्यवस्थापक ह्वा-रंग किम, डेप्युटी जनरल मॅनेजर मून-यंग चोई, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता अशोक भालकर, प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील पांढरे, महानगर नियोजनकार सुनील मरळे, लेखा व वित्त विभागाच्या वित्तीय नियंत्रण पद्मश्री तळदेकर, जमीन व मालमत्ता विभागाच्या सह आयुक्त स्नेहल बर्गे, प्रभारी सह आयुक्त हिम्मत खराडे, नगर रचनाकार श्वेता पाटील, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी प्रशांत पाटील, सायन्स आणि टेक्निकल पार्क सीनियर ग्रुप डायरेक्टर विक्रम सराफ यांच्यासह आदी उपस्थित होते.
पीएमआरडीएच्या प्रकल्पांना भेटी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या गृह प्रकल्पांना दक्षिण कोरियाच्या बुसान मेट्रोपॉलिटीन कॉर्पोरेशनच्या (बीएमसी) शिष्टमंडळाने सोमवारी दुपारनंतर भेटी दिल्या. यात प्रामुख्याने गृहप्रकल्प, प्रस्तावित रिंग रोड यासह संभाव्य विकास कामांच्या अनुषंगाने सुरू असलेल्या प्रकल्पांना भेटी देत त्याची माहिती पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले असून यादरम्यान ते पीएमआरडीएच्या विकास कामांची माहिती जाणून घेणार आहे. यासह आगामी काळात भागीदारी तत्वावर कुठली विकास कामे करता येऊ शकतात तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचे आदान प्रदानावर विचार करणार आहे.
- डॉ. ज्ञानेश्वर भाले,
जनसंपर्क अधिकारी, पीएमआरडीए