पुणे : युवा व्हायोलिनवादक मानसकुमार आणि ज्येष्ठ तबलावादक विभव नागेशकर यांनी आपल्या सादरीकरणातून तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांना मानवंदना दिली.
तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त ट्रॅडिशनल बिटस् अकॅडमी आणि शिष्यवर्गातर्फे भरत नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फैय्याज हुसेन खाँ, ज्येष्ठ तबलावादक पंडित पांडुरंग मुखडे, उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांचे शिष्य भरत जंगम, राजू जावळकर, अभय जोशी, सलीम अख्तर, विश्वास जाधव, दिनकर पांडे, प्रकाश केमकर, सुहास पेटवे, सुनील देशपांडे, पंडित जयंत नाईक तसेच उल्हास पवार, अन्वर कुरेशी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, नटराज पूजन आणि उस्ताद आमिर हुसेन खाँ तसेच उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
गुरूंची आठवण ठेऊन शिष्यांनी आपली कला प्रदर्शित करून सांगीतिक मानवंदना दिली हे कौतुकास्पद असल्याचे उस्ताद फैय्याज हुसेन खाँ म्हणाले.
व्हायोलिन वादनाची सुरुवात मानसकुमार यांन राग श्रीने केली. त्यानंतर राग मियामल्हार सादर केला. मैफलीची सांगता ‘का करू सजनी आए ना बालम’ ही रचना ऐकवून केली. त्यांच्या व्हायोलिन वादनातून तंतकारीची नजाकत दिसून आली व उत्तम वातावरणनिर्मिती झाली. त्यांना सलीम अख्तर यांनी तबलासाथ केली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ तबलावादक पंडित विभव नागेशकर यांचे एकल तबलावादन झाले. त्यांनी सुरुवातीस तीन ताल सादर केला. त्याचप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण लयकारीचे दर्शन घडवित आमीर हुसेन खाँ यांचे वैशिष्ट्य असलेला रेला, तुकडे, पारंपरिक बंदिशी, बंद बोलाचा साधा बोल, काकपद, पंजाबी ताल यांचे प्रभावी सादरीकरण केले. शंतनू खेर यांनी लेहरा तर निनाद नांदलस्कर यांनी तबलासाथ केली.
कलाकारांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कलाकारांचा सत्कार उस्ताद फैय्याज हुसेन खाँ, पांडुरंग मुखडे आणि सलीम अख्तर यांनी केला. सूत्रसंचालन अभय जबडे यांनी केले. भरत नाट्य मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे यांचे सहकार्य लाभले.