मुंबई-छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नसून ते आमच्या अस्मितेचा विषय आहेत. मात्र विरोधकांकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. हे अतिशय दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
शिंदे पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीचं हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही अतिशय वाईट आणि दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही अत्यंत संवेदनशील बाब आहे. तमाम महाराष्ट्रातील शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत.कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडण्यात आला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार असल्याचेही एकनाथ शिंदे म्हणालेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आधी मुंबई उच्च न्यायालयात गेले, आता नागपूर खंडपीठात गेले. गरीब भगिनींना आम्ही पैसे देत आहोत तर यांच्या पोटात का दुखतं? असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. तसेच यावरुन यांची मानसिकता समजत असल्याचेही शिंदे म्हणालेत.