राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार पुरस्काराचे वितरण
पुणे, दि. १ सप्टेंबर, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने याविषयी माहिती कळविण्यात आली असून येत्या मंगळवार दि ३ सप्टेंबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थित मुंबई येथील विधानभवनामधील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार शिरोळे यांना प्रदान करण्यात येईल.
साल २०२१-२२ करीता हा पुरस्कार देण्यात येणार असून या दरम्यान सिद्धार्थ शिरोळे यांनी सभागृहात छत्रपती शिवाजीनगर मतदार संघातील विविध प्रश्न, समस्यांची केलेली मांडणी, उपस्थित केलेले मुद्दे यांसाठी तो प्रदान करण्यात येईल. यामध्ये सिद्धार्थ शिरोळे यांनी विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी, खडकी कॅन्टोनमेंटचा महापालिका हद्दीत समावेश, नदीतील जलपर्णी, मराठा आरक्षण, मतदार संघातील पूरग्रस्त वसाहती यांसोबतच इतर अनेक विषयांवर भाषणे केली आहेत.