- गॅलेक्सी आय केअर हाॅस्पिटल लॅसिक लेसर व रेटिना सेंटरचे उद्घाटन संपन्न
- लोकमान्य मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीचे विशेष सहकार्य
पुणे -ः चार दशकांहून अधिक काळ संपूर्ण राज्यभरात पद्मश्री डाॅ. मनोहर डोळे यांचे नेत्र सेवेचे कार्य सर्वश्रृत आहे. दोन लाखांपेक्षा जास्त नेत्र शल्यचिकित्सा केल्याबद्दल नुकताच डाॅ. मनोहर डोळे यांना सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देखील मिळाला आहे. त्यांचे हेच नेत्रसेवेचे कार्य आता पुण्यातही होणार असल्याचा मला मनस्वी आनंद आहे, अशी भावना केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.
डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन द्वारा संचालित गॅलेक्सी आय केअर हाॅस्पिटल लॅसिक, लेसर व रेटिना सेंटरचे उद्घाटन मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार अतुल बेनके, माजी खासदार प्रदीप रावत, भाजपच्या निवेदिता एकबोटे तसेच लोकमान्य मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे खजीनदार महेश सूर्यवंशी, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, यांच्यासह पद्मश्री डाॅ. मनोहर डोळे, डोळे मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डाॅ. संजीव डोळे, डाॅ. संदीप डोळे, डाॅ. स्वाती दीक्षित, वीरेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पद्मश्री डॉ. मनोहर डोळे यांनी सर्वसामान्य व गरजू नागरिकांच्या नेत्रसेवेचे फार मोठे कार्य केले आहे. रुग्णांची आपल्या मुलांप्रमाणे काळजी घेऊन डाॅ. डोळे यांनी केलेल्या कार्याला कुठेच तोड नाही. त्यांच्या या कार्याचा विस्तार आज या हाॅस्पिटलच्या माध्यमातून होत आहे. ज्यांना नेत्रसेवेची गरज आहे अशा पुणेकरांसाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे.
या प्रसंगी बोलताना डाॅ. संदीप डोळे म्हणाले की, फाउंडेशनच्य माध्यमातून डोळे परिवार गेल्या चार दशकांपासून नेत्रसेवा करीत आहे. आजवर पुणे, नाशिक नगर जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक नेत्रचिकित्सा करण्यात आल्या आहेत. आम्हाला याचा फार आनंद आहे. आता पुणेकरांसाठी नेत्रसेवेचे एक नवे दालन आम्ही उघडले आहे. माफक दरात दर्जेदार सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी आम्हाला लोकमान्य मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीचे विशेष सहकार्य लाभले आहे.
माजी खासदार प्रदीप रावत, आमदार अतुल बेनके यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.